अकोले |प्रतिनिधी| Akole
अकोले तालुक्यातील बहुतांश भागात सलग पाचव्या दिवशी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर व शेतात मोठ्या प्रमाणावर पाणी साठले होते. अकोले शहर व परिसरात काल दुपारच्यावेळी एक ते दीड तास जोरदार पाऊस पडला.आढळा व प्रवरा विभागात सर्वदूर धुव्वाधार पाउस कोसळला.
आढळा विभागातील समशेरपुर, टाहाकारी, सावरगाव पाट, देवठाण, तांभोळ, विरगाव, पिंपळगाव निपाणी, हिवरगाव, डोंगरगाव, गणोरे, या गावांसह प्रवरा पट्ट्यातील विठे ते कळस पट्ट्यातील सर्व गावांतही दुपारी मुसळधार पाऊस कोसळल्याने रस्त्यावर व शेतांमध्ये पाणीच पाणी साठले होते. ओढे नाले यांचे पाणी नदीला मिळत आहे.त्यामुळे प्रवरानदी पात्र वाहते झाले आहे.
मुळा विभागातील काही गावांत अवकाळी पावसाने हजेरी लावली. तर आदिवासी भागातील पश्चिम पट्ट्यात अवकाळी पावसामुळे शेती पिकांसह, शाळा खोल्या, ग्रामपंचायत इमारत, घरे, जनावरांचे गोठे, रस्त्यांचे सततच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन आदिवासी विभागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. जोरदार पावसामुळे खराब झालेले शिरपुंजे ग्रामपंचायतचे पत्रे यापूर्वी दोन वेळेस दुरुस्त करण्यात आले होते. त्यांनतरही दोन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे काही पत्रे वाकले आहेत. लोखंडी पोलही वाकले आहेत. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे या कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायतच्या कारभारा बाबत नाराजी व्यक्त केली आहे.
अकोले तालुक्यामध्ये पश्चिम विभागामध्ये गेल्या तीन ते चार दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर अवकाळी पाऊस पडत असून या पावसामुळे शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. यासंबंधी शेतकर्यांच्या पिकांचा पंचनामा करून शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख महेशराव नवले यांनी केली आहे.
त्वरित पंचनामे करा- माजी खा. लोखंडे
अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकर्यांचे त्वरित पंचनामे करावे व आर्थिक मदत करण्यात यावी अशी मागणी माजी खा. सदाशिव लोखंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. खा .लोखंडे यांनी निवेदनात म्हटले, आदिवासी भागांमध्ये अवकाळी पावसाने शेतकर्यांचे नुकसान केले. वादळ, वार्यामुळे शेड, घरांचे नुकसान झाले आहे. पिंपळदरी, चास, लिंगदेव, लहीत, खडकी, शिसवद वांजुळशेत, शेलद या भागात शेतीचे नुकसान झाले असून कांदा पिकाचे व उन्हाळी बाजरीचेही अतोनात नुकसान झाले आहे. शेतात उभी असणारी भाजीपाला पिके सडली आहेत. टोमॅटो, फ्लॉवर, कोबी पिके वाया गेली असून, कोथंबीर पीकही सडून गेले आहे. कळस येथे झाड पडून एक शेतकरी दगावला असून पिंपळदरी येथे कुक्कुटपालन शेड कोसळून कोंबड्यांची पिले मृत आहेत. या सर्वांचे पंचनामे करून तातडीने मदत मिळावी असेही निवेदनात म्हटले आहे. या निवेदनाच्या प्रती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांना देण्यात आलेले आहे.