Thursday, September 12, 2024
Homeनगरअकोलेतील 203 शिक्षकांना हवी कायमस्वरूपी एकस्तरीय वेतनश्रेणी!

अकोलेतील 203 शिक्षकांना हवी कायमस्वरूपी एकस्तरीय वेतनश्रेणी!

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अकोले तालुक्यातील आदिवासी भागात काम करणार्‍या 203 प्राथमिक शिक्षकांना कायम स्वरूपी एकस्तर वेतनश्रेणी हवी आहे. या वेतन श्रेणीसाठी संबंधीत 203 शिक्षकांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या आदेशानूसार या शिक्षकांची मंगळवारी सांयकाळी जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्यासमोर सुनावणी पूर्ण झाली असून सुनावणीनंतर मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर यांनी आपला निकाल राखून ठेवला आहे.

- Advertisement -

आदिवासी भागात (पेसामध्ये) कार्यरत असणार्‍या प्राथमिक शिक्षकांना एकस्तरीय वेतनश्रेणी देण्यात येते. ही वेतनश्रेणी संबंधित शिक्षक आदिवासी भागात कार्यरत असेपर्यंत लागू राहते. मात्र, संबंधित शिक्षकांना 12 वर्षांनंतर वरिष्ठ वेतनश्रेणी लागू होते. एकदा वरिष्ठ वेतनश्रेणी लागू झाल्यानंतर एकस्तरीय वेतनश्रेणी आपोआप रद्द होते. वरिष्ठ वेतनश्रेणी अथवा एकस्तरीय वेतनश्रेणी यापैकी कोणतीही एकच वेतनश्रेणी सुरू ठेवता येते, असा शासन निर्णय आहे. मात्र, अकोले तालुक्यात कार्यरत असणार्‍या 203 प्राथमिक शिक्षकांनी एकस्तरीय वेतनश्रेणीसह वरिष्ठ वेतनश्रेणी अशा दोनही वेतनश्रेणी सुरू ठेवाव्यात, अशी मागणी करत याप्रकरणी न्यायालयात धाव घेतली.

न्यायालयाच्या निदेशानूसार मंगळवारी जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर यांच्यासमोर या प्रकरणी सुनावणी झाली. यात संबंधीत 203 शिक्षकांच्यावतीने वकीलांच्या मार्फत आपली बाजू मांडण्यात आलेली आहे. यात संबंधीत शिक्षक हे कायम स्वरूपी आदिवासी भागत कार्यरत असल्याने त्यांना कायमस्वरूपी एकस्तरीय वेतनश्रेणी आणि वरिष्ठ वेतनश्रेणी अशा दोन्ही लागू राहव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. सुनावणीनंतर मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर यांनी याबाबत आपले आदेश राखून ठेवले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या