अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
अकोले येथील कांदा व्यापार्याची सुमारे एक कोटीची फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एकाला अटक केली आहे. जयेश सन ऑफ गोंपिनाथन (रा. त्रिशुर, केरळ) असे त्याचे नाव आहे. दरम्यान, त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
कोतूळ (ता. अकोले) येथील कांदा व्यापारी सिताराम काशिनाथ देशमुख (वय 58) यांची एक कोटी 53 हजार रुपयांची फसवणूक झाली असून त्यांनी सन 2017 मध्ये अकोले पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पाच जणांविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास येथील आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू असून पोलीस उपअधीक्षक कमलाकर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक हसन शेख, अंमलदार अजय खोमणे, नियाज शेख यांनी गोंपिनाथन याला अटक केली आहे. सदरचा गुन्हा प्रोपा पी.पी.एच. टेडर्स, सी.एन.व्ही.मार्केट पालायाम (जि. कालीकेट, केरळ), प्रोप्रा सी.ए.ब्रदर्स, (मार्केट रस्ता, थोडूपुंजा, केरळ), प्रोप्रा अल्मास वनयण ट्रेडींग कंपनी (त्रिंमबावर, त्रिसुर, केरळ), जयेश सन ऑफ गोंपिनाथन व अब्दुला (रा. टेंपलगेट, ता. तलसरी, जि. कन्नुर, केरळ) यांच्याविरोधात दाखल झालेला आहे.
संशयित आरोपी यांनी कांदा व्यापारी देशमुख यांच्याकडून संगनमताने 64 ट्रक कांदा विक्रीसाठी घेतला होता. सदर कांद्याच्या व्यवहारापोटी देणे असलेली एक कोटी 53 हजारांची रक्कम देशमुख यांना न देता त्यांची फसवणूक केली आहे. दरम्यान, फसवणूक झाल्यानंतर देशमुख यांनी न्यायालयात प्रकरण दाखल केले होते. न्यायालयाने दिलेल्या सीआरपीसी कलम 156(3) प्रमाणे सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अनेकांना घातला गंडा
अटक केलेला जयेश सन ऑफ गोंपिनाथन याने इतर चौघांच्या मदतीने नगर जिल्ह्यासह राज्यातील अनेक कांदा व्यापार्यांची फसवणूक केलेली असल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे. संबंधित संशयित आरोपींविरोधात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.