अकोले |प्रतिनिधी| Akole
आजी-माजी आमदारांसह आमदारकीचे स्वप्न पाहणारे भावी आमदार, आदिवासी नेते व कार्यकर्त्यांची पावले आदिवासी दिनाच्या कार्यक्रमात डीजेच्या ठेक्यावर थिरकली. अकोले शहरासह तालुक्यात आदिवासी वादळ बुधवारी घोंगावताना दिसले.
शिक्षणामुळे क्रांती घडते समाजाने शिक्षण घेऊन समाज संघटनेसाठी एकत्र येण्याची आवश्यकता असून नवीन पिढीने शिक्षण घेऊन समाजाचे काही तरी देणे लागतो हा विचार ठेवून कार्य करा असे सांगतानाच आजच्या दिवशी ब्रिटिशांना चले जाव इशारा महात्मा गांधी यांनी केला तर ‘मेरी माटी मेरा देश’ ही पंतप्रधान मोदी यांची संकल्पना आदिवासींच्या हिताची असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री व अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे कार्याध्यक्ष मधुकरराव पिचड यांनी राजूर येथे केले.
राष्ट्रपतीपदी श्रीमती मुर्मू यांना पंतप्रधान मोदी यांनी संधी देऊन आदिवासी समाजाला न्याय दिला त्याबद्दल त्यांचे माजी मंत्री पिचड यांनी आभार मानले तर मणिपूर घटनेचा निषेध करत वस्तुस्थिती वेगळी असून केंद्र सरकारला दोष देणे योग्य ठरणार नाही असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
राजूर शहरातून आदिवासी समाजाने ढोल, लेजिम, पारंपरिक नृत्य करत भव्य मिरवणूक काढली हजारो विद्यार्थी आदिवासी कार्यकर्ते, महिला, युवक यात सहभागी झाले होते. कार्यक्रमस्थळी विद्यार्थ्यांनी विविध लोकसंस्कृती, आदिवासी नृत्य सादर केले. क्रांतिवीर राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्याहस्ते पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली.
जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून चाळीस गाव डांगणातील सरपंच, सहकारी संस्थांच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी सरपंच सौ. हेमलतताई पिचड, माजी आमदार वैभव पिचड, अजित महाराज दिघे, सचिव मंगलदास भवारी, आदिवासी उन्नती सेवा संस्थेचे अध्यक्ष भरत घाणे, उपाध्यक्ष सी. बी. भांगरे, माजी सभापती दत्ता देशमुख, सरपंच गणपत देशमुख, विजय भांगरे, पांडुरंग खाडे, सुनील सारुक्ते, सुरेश भांगरे, पांडुरंग भांगरे, गंगाराम धिंदले, सयाजी अस्वले, गोरक्ष परते, डॉ. अनंत घाणे, तुकाराम खाडे, उपसरपंच संतोष बनसोडे, गोकुळ कानकाटे आदी उपस्थित होते.
अजित महाराज दिघे म्हणाले, हिंदू धर्माला नाकारून ख्रिश्चन धर्म स्विकारता हे तत्व पटते का? साधा भोळा आदिवासी समाजाला धर्माच्या नावाखाली फसवले जात आहे. घोंगडी बैठका घेऊन आदिवासी समाजाला धर्मांतर करण्यास भाग पाडले जाते. आपला देव रावण आहे हे मनात बिंबवले जाते, रावण हा आदिवासींचा आहे का? तो ब्राह्मण पुत्र आहे, आमची जात महादेव कोळी. आम्ही शंकराचे उपासक आहोत मग गणपती स्वीकारायचा नाही हा विद्रोही विचार मनातून काढून टाका.
माजी आमदार वैभव पिचड म्हणाले, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. ते घेतल्यावर डरकाळी फोडल्याशिवाय विद्यार्थी राहणार नाही. भविष्यात ज्याच्याकडे ज्ञान तो श्रीमंत समजला जाईल आध्यात्मिकतेची कास धरून शिक्षण घ्या आदिवासी समाजाने शिका, संघटित व्हा संघर्ष करा हे ब्रीद अंगीकारावे, असे आवाहन केले.
माजी आमदार पिचड यांनी आदिवासी नृत्यावर विद्यार्थ्यांसोबत ठेका धरला. राजूर शहरात तीन तास मिरवणूक सुरू होती. पिचड व कार्यकर्त्यांचे नृत्य सर्वांचे आकर्षण ठरले.
यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तर विविध गुणदर्शन कार्यक्रम संपन्न झाला. सूत्रसंचालन राम पवार यांनी केले तर आभार दत्ता जाधव यांनी मानले.
माजी मंत्री मधुकरराव पिचड, आ. डॉ. किरण लहामटे, माजी आमदार वैभव पिचड, अगस्ति कारखान्याच्या उपाध्यक्षा सुनीताताई भांगरे, जिल्हा बँकेचे संचालक अमित भांगरे, माजी सभापती मारुती मेंगाळ, काँग्रेसचे नेते सतीश भांगरे, सेनेचे नेते मधुकरराव तळपाडे यांच्यासह विविध नेते व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत आदिवासी दिन मोठ्या जल्लोषात साजरा केला.
आदिवासी समाजाचे प्रेरणास्थान असणारे बिरसा मुंडा, आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या विचारांना अभिवादन करत अकोले शहर, राजूर परिसरात आदिवासी दिनानिमित्ताने मोठी जंगी मिरवणूक काढण्यात आली होती. देवठाण येथे ही ठाकर समाजाच्यावतीने राया ठाकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार पं. सं. चे माजी सभापती मारुती मेंगाळ, दीपक पथवे यांनी घातला. तर भव्यदिव्य मिरवणूक काढण्यात आल्याने ठाकर समाज बांधवांमधून सामजिक एकीचे दर्शन दिसून आले. अकोले शहरात जागतिक आदिवासी दिनानिमित्त मिरवणुकीमुळे कोल्हार-घोटी राज्यमार्गावर अकोल्यात पाच ते सात हजार आदिवासी बांधवांनी मोठी गर्दी केली होती.
जागतिक आदिवासी दिन व ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने अकोले येथे जिल्हा सहकारी बँकेच्या प्रांगणात समविचारी पक्ष व संघटनांच्या वतीने विचारमंथन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रानकवी तुकाराम धांडे अध्यक्षस्थानी होते. आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे सह रामजी भांगरे, गोविंद खाडे, रामा किरवे, राया ठाकर, देवाजी आव्हाड यांच्या सारख्या क्रांतिकारकांचा वारसा तालुक्याला लाभलेला आहे. त्यांच्या कार्याच्या आठवणींना उजाळा देतानाच आदिवासी समाजाला आज भेडसावत असणार्या विविध समस्यांवर यावेळी मान्यवरांनी विचार व्यक्त केले. प्रा. विठ्ठल शेवाळे यांनी लिहिलेल्या ‘आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे’ या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.
राघोजी भांगरे यांचे देवगाव या मूळ गावी असणार्या स्मारक स्थळावरही यानिमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तेथे वृक्षारोपण करण्यात आले.
आदिवासी समाज बांधवांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून विविध नृत्ये सादर केले. तालुक्यातील अनेक आदिवासी खेडे तसेच शाळा महाविद्यालयांमध्येही आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला.