भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara
अकोले तालुक्यात ए. एस. के. फाउंडेशन आणि बायफ संस्थेच्या मार्गदर्शनाखाली बारी, जहागीरवाडी, पांजरे, चिचोंडी आणि मुरशेत गावातील 18 शेतकर्यांनी स्ट्रॉबेरीच्या विंटर ड्रोन प्रजातीची लागवड केली. मर्चंट तंत्रज्ञान आणि सेंद्रिय पद्धतीच्या वापरामुळे पीक व्यवस्थापन सुधारले. उत्पादनाची गुणवत्ता वाढली. डिसेंबरपासून उत्पादन सुरू झाले असून प्रति शेतकरी 80 ते 85 किलोची स्ट्रॉबेरी मिळत आहे.
स्थानिक बाजारात 200 रुपये प्रति किलो दराने विक्री होत असल्याने शेतकर्यांना केवळ 1000 ते 1500 रुपयांच्या खर्चात सरासरी 18 हजार रुपये मिळाले आहेत. पुढील काही आठवड्यात अजून वीस ते पंचवीस हजार रुपयाचे उत्पन्न होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पाला ए. एस. के. प्रकल्पाचे सिद्धार्थ अय्यर, अरुणच भांबळे, अकोले विभागीय अधिकारी सुरेश सहाने, प्रकल्प समन्वयक विष्णू लोखंडे, किरण आव्हाड, मच्छिंद्र मुंडे, गोरक्ष देशमुख, वर्षा भागडे या टीमचे मार्गदर्शन लाभले. स्ट्रॉबेरी सारख्या उच्च मूल्य पिकामुळे पारंपरिक शेती बरोबर नव्या प्रयोगांना चालना मिळाली. स्थानिक वातावरणातही हे पीक यशस्वी होत असल्याचे दिसत आहे.