मुंबई | Mumbai
बदलापुरातील दोन शाळकरी मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणात ५ पोलिसांना जबाबदार ठरवण्यात आले आहे. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांनी या अहवालाचे न्यायालयात वाचन केले. यामध्ये अनेक धक्कादायक गोष्टींचा उल्लेख करत या एन्काउंटरला पोलिसच जबाबदार असल्याचे न्यायालयात नमुद करण्यात आले आहे.
अक्षय शिंदे याला बदलापूरच्या दिशेने नेत असताना त्याने मुंब्रा बायपासनजीक गाडीतच पोलिसांची रिव्हॉल्व्हर हिसकावून घेतली. यामधून त्याने पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. त्यानंतर पोलिसांन स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षयचा मृत्यू झाला, असा दावा पोलिसांकडून करण्यात आला होता. मात्र, चौकशी अहवालात अक्षय शिंदे याला बनावट चकमकीत मारण्यात आल्याचे नमूद करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. अक्षय शिंदेच्या मृत्यूला ५ पोलिस जाबदार असल्याचे या अहवालामध्ये नमूद केले आहे. आत्मसंरक्षणासाठी गोळ्या चालवल्या होत्या असा दावा पोलिसांनी केला होता. पण पोलिसांचा हा दावा संशयास्पद असल्याचे देखील यामध्ये म्हटले आहे.
अहवालात काय म्हंटले आहे?
“अक्षय शिंदेसोबत झालेल्या झटापटीत पाच पोलिसांनी वापरलेला बळाचा वापर अनावश्यक होता आणि त्याच्या मृत्यूसाठी हे पाचही पोलीस जबाबदार आहेत. पोलिसांच्या म्हणण्यांनुसार, अक्षय शिंदेंने त्यांच्यावर गोळीबार केला होता. मात्र मृताचे बंदुकीवर बोटांचे ठसे नाहीत. स्वसंरक्षणार्थ गोळीबार करणाऱ्या पोलिसांचा वैयक्तिक बचाव अवास्तव आणि संशयास्पद आहे,” असे अहवालात म्हटले आहे.
न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठाने खुल्या न्यायालयात अहवाल वाचून दाखवला. “गोळा केलेल्या साहित्यानुसार आणि एफएसएल अहवालानुसार, मृताच्या पालकांचे आरोप योग्य आहेत आणि हे पाच पोलीस त्याच्या मृत्यूसाठी जबाबदार आहेत असे म्हटले जाते,” असे न्यायमूर्ती मोहिते-डेरे यांनी अहवाल वाचून दाखवताना म्हटले.
अक्षय शिंदे याचा चकमकीत मृत्यू झाल्यानंतर घटनास्थळावरुन जमा केलेली सामुग्री आणि एफएसएल रिपोर्टनुसार, अक्षय शिंदे याच्या आई-वडिलांनी केलेले आरोप योग्य आहेत. अक्षय शिंदे याच्या मृत्यूसाठी पाच पोलीस कर्मचारी जबाबदार आहेत, असेही या अहवालात म्हटले आहे.
नेमकी घटना काय?
अक्षय शिंदे हा बदलापूरमधील शाळेत शिकणाऱ्या दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी होता. याप्रकरणात अक्षय शिंदेला अटक करण्यात आली होती. दुसऱ्या प्रकरणाच्या चौकशीसाठी अक्षय शिंदेला तळोजा कारागृहातून ठाण्यात आणले जात होते. तेव्हा मुंब्रा बायपासजवळ त्याचे एन्काऊंटर झाले होते. अक्षयच्या एन्काऊंटरनंतर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्याचा एन्काऊंटर फेक असल्याचा आरोप करण्यात आला होता.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा