मुंबई | Mumbai
बदलापूरमधील शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा (Akshay Shinde) पोलिसांसोबत झालेल्या गोळीबारात मृत्यू झाला आहे. आरोपीला ट्रान्सिट रिमांडसाठी नेत असताना त्याचा एन्काऊंटर झाल्याची माहिती आहे. पोलिसांनी स्वः संरक्षणासाठी त्याच्यावर गोळ्या झाडल्या.
पण हे एन्काऊंटर बोगस असून या प्रकरणातील इतर आरोपींना वाचवण्यासाठी पोलिसांनी हे घृणास्पद कृत्य केल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांवर केला जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता अक्षय शिंदेचे वडील अण्णा शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना थेट पत्र लिहीले आहे. या पत्राची आता सर्वत्र चर्चा आहे. या पत्रातून अक्षयच्या वडिलांनी अमित शहा यांच्याकडे काही मागण्या केल्या आहेत.
अण्णा शिंदे यांनी लिहिलेल्या पत्रात, अमित शाह(Amit Shah) यांच्याकडे स्वतःचे कुटुंब आणि वकील अमित कटारनवरे यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. ज्याप्रमाणे किरीट सोमय्या यांना संरक्षण दिले आहे त्यापेक्षा जास्त संरक्षण आम्हाला द्यावे, कारण किरीट सोमय्या यांच्या पेक्षा जास्त धोका आम्हाला सत्ताधारी, माफिया आणि त्यांच्या चेले चपाट्या कडून आहे, असे पत्रात सांगून संरक्षणाची मागणी केली आहे. तसेच हे प्रकरण झाल्यानंतर आम्हाला तसेच आमच्या वकिलांना धमक्या येत आहेत, अक्षय शिंदे याचा खून राजकीय फायद्यासाठी करण्यात आल्याचे देखील या पत्रात नमूद करण्यात आले आहे.