नाशिक । दिनेश सोनवणे
आज अक्षय्य तृतीया. वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय्य तृतीया म्हणतात. त्यालाच खान्देशात आखाजी असेही म्हटले जाते. अक्षय्य म्हणजे कधीही क्षय न पावणारी. हा मुहूर्त साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. या सणाला माहेरवाशिणी माहेरी येतात, गोडधोड होतं. सालदार, बलुतेदार या दिवसापासून नवी सुरुवात करतात. मौजमजा केली जाते, आंब्यांच्या हंगामाला खर्या अर्थाने याच दिवसापासून सुरुवात होते.
या दिवशी मातीचे मडके किंवा घागर पुजली जाते. हल्ली मातीचे माठही महाग झाल्याने काही गृहिणी घरातील तांब्याच्या कळशीत पाणी भरून पुजताना दिसतात. अक्षय्य तृतीयेसाठी घर सारवून, झाडून स्वच्छ करतात. घरातील प्रत्येक वस्तू साफ केली जाते. पत्र्याचे डबे, भांडी नदीवर नेऊन घासून आणली जातात. दीपावलीप्रमाणेच आखाजीसाठी घराची साफसफाई केली जाते. ही तयारी आखाजीपूर्वी पंधरा-वीस दिवस आधीच सुरू होते.
घराघरांत सांजोर्या आणि घुण्या हे पदार्थ बनविले जातात. सांजोर्या या साखर घालून बनविल्या जातात तर काही भागात गुळाच्या सांजार्यादेखील बनवतात. उन्हाळ्यात सकाळी उन्हातून प्रवास करून आल्यावर साखर, गुळाची सांजोरी शरीराला साखर देते त्यामूळे उन्हाची बाधा टळते असेही म्हटले जाते.
गावाच्या नदीकाठी मुली जमतात. तेथे झिम्मा, फुगडी खेळतात, नाचतात, गाणी म्हणतात. नदीच्या दुसर्या काठावर दुसर्या गावच्या मुलीदेखील हाच कार्यक्रम पार पाडत असतात. यादरम्यान दोन्ही गावातील महिलावर्ग परस्परांवर दगडफेक करतात, गोटे मारतात. या खेळाला खानदेशात बार खेळणे म्हणतात. बार खेळून झाल्यावर अंधार पडण्यापूर्वी त्या आपापल्या घराकडे ते परततात. अलीकडे बार खेळण्याची प्रथा बर्याच गावांतून कमी झाली आहे. असा हा अक्षय्य तृतीयेचा सण मोठ्या उत्साहात दरवर्षी साजरी केला जातो.
बंधनमुक्तीचा दिवस
हा सण सर्वासाठी बंधनमुक्तीचा दिवस असतो. या दिवशी स्त्री, पुरुष, शेतकरी, शेतमजूर, आबालवृद्ध या सर्वांसाठी मुक्तीचा दिवस असतो. काम करणार्या मजुरांना या दिवशी सुटी असते. शेतकरी सर्व शेतीची कामे या दिवशी बंद ठेवतात. प्रत्येक विवाहित स्त्री या दिवशी सणानिमित्ताने माहेरी आलेली असल्याने ती झोके खेळायला, गाणी गायला, झिम्मा-फुगडी खेळायला पूर्ण मुक्त असते. आबालवृद्धांसाठी आमरस, पुरणाच्या पोळीची मेजवाणीच असते.
सण उत्सवांची मौजमजा नाही
घरातील मुले, मुली इतरत्र शहरांत शिक्षण, नोकरीच्या निमित्ताने दूर चालले गेले आहेत. त्यांना खेडयात परतता येत नाही. सलग दोन वर्षे करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामूळे गर्दी करण्यावर बंधनं आहेत. अनेक घरात मुलंच नाहीत, कुटुंबात सदस्य संख्याही कमी झाली, सगळे विभक्त झाले आहेत. शिवाय पुरणाचे मांडे खापरावर भाजतादेखील अनेकांना येत नाहीत. मांडयांची जागा आता तव्यावरच्या लहान पुरणपोळ्यांनी घेतलेली आहे. स्वयंपाकातील पदार्थाची संख्याही कमीकमी होत चालली आहे.