Saturday, July 27, 2024
Homeजळगावजळगावातील बहुसंख्य आमदारांसाठी धोक्याची घंटा!

जळगावातील बहुसंख्य आमदारांसाठी धोक्याची घंटा!


लोकसभा निवडणूक संपली असली तरी तिचे कवित्व अद्याप सुरु आहे. येत्या चार महिन्यात राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार असल्याने लोकसभेच्या निकालाकडे रंगीत तालीम म्हणून पाहिले जात आहे. जिल्ह्यातील शिवसेनेच्या पाच आणि राष्ट्रवादीचे एक अशा सहा आमदारांनी मध्यंतरी वेगळी भूमिका घेतल्याने विरोधकांनी त्यांच्यावर गद्दारीचा शिक्का मारला. मात्र लोकसभेच्या निकालात हा मुद्दा बर्‍याच अंशी निकालात निघालेला दिसला. या सहाही आमदारांनी आपापल्या मतदारसंघात पकड कायम ठेवल्याचे दिसून येते. मात्र या यशाने या सहा सह अन्य सर्वच आमदारांनीही फारसे हुरळून जायची गरज नाही. घटलेले मताधिक्य या सर्वांसाठी धोक्याची घंटाच आहे. येत्या तीन ते चार महिन्यात या आमदारांना वार्षिक परीक्षेला सामोरे जायचे आहे.


गेली पाच वर्षे राज्याच्या राजकारणात अतिशय विचित्र गेले. भाजपा शिवसेना युती एकत्रित लढले. त्यांना बहुमतही मिळाले. मात्र शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसची आघाडी होऊन भाजपाला दूर ठेवत महाविकास आघाडीचे सरकार आले. अडीच वर्षे हे सरकार टिकले त्यानंतर विचित्र घडामोडी घडल्या. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत मोठे बंड झाले. सुमारे ५० आमदार शिंदेंसोबत गेले. यात जळगाव जिल्ह्यातून मंत्री गुलाबराव पाटील, चिमणराव पाटील, किशोरआप्पा पाटील, सौ. लता सोनवणे व अपक्ष चंद्रकांत पाटील या पाच आमदारांचा समावेश होता. पुढे काही महिन्यातच राष्ट्रवादी मधेही हाच कित्ता गिरावला गेला. त्यातही आ. अनिल पाटील शरद पावरांना सोडून अजित पवारांसोबत गेले.

- Advertisement -

या दोन्ही घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणाचे संदर्भही बदलले. जिल्ह्यातील या सहा आमदारांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर लोकसभा निवडणुकीत प्रथमच ते जनमताला सामोरे गेले. या सहा आमदारांच्या जनाधाराचीही कसोटी होती. जळगावातील दोन्ही जागी भाजपाचे उमेदवार होते तर विरोधात आघाडीचे उमेदवार होते. जिल्ह्यात भाजपचे वर्चस्व असले तरी यावेळी परिस्थिती वेगळी होती. भाजपाबद्दल असलेला रोष, ‘त्या’ सहा आमदारांची भूमिका, महाआघाडी बाबत असलेली सहानुभूती यामुळे जिल्ह्यातील लढती फार काट्याच्या होतील अशी अटकळ होती. मात्र निकाल तसे एकतर्फीच लागले. दोन्ही ठिकाणी दोन लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने भाजपा उमेदवार विजयी झाले.
राज्यात लोकसभा निवडणुकीनंतर चार सहा महिन्यात विधानसभेची निवडणूक होते. त्यामुळे आमदारांसाठी लोकसभा निवडणूक सेमिफायनल असते. जिल्ह्यात गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे बंडखोर अनेक ठिकाणी होते. एका मतदारसंघात तर अधिकृत बंडखोर असे बिरुद लावून एक महाभाग फिरत होते.


विधानसभेत भाजपाच्या बंडखोरीचा इतिहास नवा नाही. शिवसेनेचे आमदार, पदाधिकारी लोकसभेत भाजपासाठी एकदिलाने काम करतात मात्र विधानसभा निवडणुकीत ही परतफेड होत नाही, हा बर्‍याच जणांचा अनुभव आहे. यावेळी लोकसभेच्या मेळाव्यात मंत्री गुलाबराव पाटलांनी लोकसेभेत आय लव यू आणि विधानसभेत आय हेट यू… असे होऊ नये अशी अपेक्षा व्यक्त करून एकप्रकारे खदखद मोकळी केली होती. शिवसेनेच्या सर्वच आमदारांनी लोकसभेत चोख काम केले, हे आकडेवारी सांगते. आता विधानसभेत याची परतफेड भाजपा कशी करते हे महत्त्वाचे ठरणार आहे.
शिवसेनेच्या पाच, भाजपाच्या चार, राष्ट्रवादीचे एक अशा महायुतीच्या १० आमदारांनी त्यांच्या त्यांच्या मतदारसंघात भाजपा उमेदवाराला आघाडी दिली आहे, कॉंग्रेसचे आमदार शिरीष चौधरी यांच्या रावेर मतदारसंघातून देखील भाजपालाच आघाडी आहे. मात्र प्रत्येक मतदारसंघात मताधिक्य घटले आहे. गेल्या लोकसभेच्या तुलनेत मंत्री अनिल पाटील यांच्या अमळनेर मतदारसंघात फक्त भाजपाला आघाडी आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या जळगाव ग्रामीण मध्ये फार थोडा फरक आहे. उर्वरित नऊ आमदारांच्या मतदारसंघातील मताधिक्य घटले आहे.
जळगाव शहरातून गेल्या लोकसभेला ७१ हजाराचे मताधिक्य होते आता ते १० हजाराने घटून ६१ हजार झाले आहे. गेल्या विधानसभेत आ.राजूमामा भोळे हे सुमारे ६५ हजारांच्या मताधिक्क्याने विजयी झाले होते. यावेळी आ.भोळे यांना शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवाराविरुध्द लढत द्यावी लागेल.
यापक्षाकडून सध्या अनेक इच्छुक आहेत.
गेल्यावेळी जळगाव ग्रामीण मधून भाजपाला सुमारे ६५ हजाराची आघाडी होती, ती आता ६३ हजार झाली आहे. गेल्या विधानसभेला गुलाबराव पाटील यांनी अपक्ष चंद्रशेखर अत्तरदे यांच्या विरोधात सुमारे ४७ हजाराची आघाडी घेत विजय मिळावीला होता. यावेळी त्यांचा सामना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे गुलाबराव देवकर यांच्याशी होण्याची शक्यता आहे.
अमळनेरमध्ये गेल्यावेळी अपक्ष शिरीष चौधरी यांनी भाजपाला सुमारे ६१ हजाराची आघाडी दिली होती. आता मंत्री अनिल पाटील यांनी भाजपाला सर्वाधिक ७१ हजाराची आघाडी दिली. उमेदवार स्वतः स्थानिक असल्यामुळे देखील येथे मताधिक्य वाढल्याची शक्यता आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या अनिल पाटील यांनी भाजपाच्या शिरीष चौधरी यांचा साडे आठ हजाराने पराभव केला होता. यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी शिरीष चौधरी पुन्हा सक्रिय झाले आहेत. निवृत्त एटीएस अधिकारी प्रकाशभाई पटेल यांनीही जोरदार तयारी सुरु केली आहे. शिवाय महाविकास आघाडीकडून डॉ.अनिल शिंदे व ऍड.ललिता पाटीलही इच्छुक आहेत. एकंदर आता लोकसभेत मोठे मताधिक्य दिले असले तरी मंत्री अनिल पाटील यांना गाफिल राहून चालणार नाही.
एरंडोल-पारोळा मतदारसंघातून भाजपाला गेल्या वेळी ७३ हजाराचे मताधिक्य होते. ते घटून आता केवळ २२ हजार झाले आहे. विरोधी उमेदवार स्थानिक असल्यामुळे मताधिक्य घटल्याचे गृहीत धरले तरी आ.चिमणराव पाटील यांना विधानसभेसाठी अधिक सजग राहावे लागणार आहे. गेल्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या डॉ.सतीश पाटील यांचा सुमारे १८ हजार मतांनी पराभव केला होता. यावेळी पुन्हा चिमणआबा विरुद्ध डॉ.सतीश पाटील ही परंपरागत लढत होण्याची शक्यता आहे.


आमदार असलेल्या उन्मेष पाटील यांनाच लोकसभेची उमेदवारी मिळाली होती. स्थानिक असल्यामुळे उन्मेष पाटील यांना चाळीसगाव मधून सुमारे ६३ हजाराचे मताधिक्य होते. यावेळी उन्मेष पाटील यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांनी शिवसेना उद्धव गटात प्रवेश केला. मित्राला आघाडीची उमेदवारी मिळवून देत उन्मेष पाटील यांनी भाजपा विरोधात जंग जंग पछाडले. आ. मंगेश चव्हाण यांनीही युतीच्या विजयासाठी नेटाने काम केले. चाळीसगाव मधून कोणाला मताधिक्य मिळते याकडे लक्ष लागून होते मात्र आ.चव्हाण यांनी बाजी मारली. असे असले तरी गेल्यावेळचे ६३ हजाराचे मताधिक्य आता अवघ्या १६ हजारावर आले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत चव्हाण यांनी राष्ट्रवादीच्या राजीव देशमुख यांचा चार हजार मतांनी पराभव केला होता. येणार्‍या विधानसभेत उन्मेष पाटील विरुद्ध मंगेश चव्हाण असा रोमांचक सामना होण्याची शक्यता आहे.
पाचोरा मतदारसंघातून गेल्यावेळी भाजपाला ७५ हजाराचे मताधिक्य होते, यावेळी ते केवळ १६,५०० इतके घटले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत आ.किशोरआप्पा पाटील यांनी राष्ट्रवादी व भाजपा बंडखोर अशा तिहेरी लढतीत अवघ्या दोन हजार मतांनी विजय मिळाविला होता. येणार्‍या विधानसभेत किशोरआप्पा पाटील यांचा आर.ओ.तात्या पाटील यांच्या कन्या वैशाली सूर्यवंशी यांच्याशी सामना आहे. भाजपाचेच अमोल शिंदे यांच्या महत्वाकांक्षा लपून राहिलेल्या नाहीत. त्यामुळे किशोरआप्पा यांना काळजीपूर्वक पावले उचलावी लागणार आहेत.
चोपडा मतदारसंघातून गेल्या वेळी भाजपाला ७७ हजाराची आघाडी होती आता ती ६३ हजार झाली आहे. विधानसभा निवडणुकीत सौ.लता सोनवणे या २० हजाराच्या फरकाने विजयी झाल्या होत्या. आता येणार्‍या निवडणुकीत राष्ट्रवादी कोणाला उमेदवारी देते व मतविभागणी कशी होते यावर लढत अवलंबून असणार आहे.
रावेर मधून तत्कालीन आ.स्व.हरिभाऊ जावळे यांनी भाजपाला ३९ हजाराचे मताधिक्य दिले होते. यावेळी तेथून भाजपाला ३५ हजाराचे मताधिक्य मिळाले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत तिरंगी लढतीत कॉंग्रेसचे शिरीष चौधरी १५ हजारावर फरकाने विजयी झाले होते. कॉंग्रेसचे आमदार असताना व आघाडीचा उमेदवार स्थानिक असताना भाजपाला रावेरमधून आघाडी मिळणे आ.चौधरी यांच्यासाठी चिंता वाढवणारे आहे. शिवाय भाजपचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, डॉ.केतकी पाटील यांची भाजपाकडून दावेदारी असेल. अनिल चौधरी पुन्हा नशीब अजमावू शकतात. अशा परिस्थितीत रावेरची लढत काट्याची होणार आहे.
भुसावळ मधून गेल्या वेळी भाजपाला सुमारे ५१ हजाराचे मताधिक्य होते ते आता ४१ हजार झाले आहे. गेल्या वेळी आ.संजय सावकारे अपक्ष डॉ.मधू मानवतकर यांच्या विरुद्ध तब्बल ५३ हजाराच्या फरकाने विजयी झाले होते. या मतदारसंघात संतोष चौधरी यांची भूमिकाही महत्वाची ठरते. ते काय भूमिका घेतात, समोर कोण उमेदवार येतात यावर येथील लढतीचे चित्र अवलंबून असणार आहे.


मंत्री गिरीश महाजन यांचे होम ग्राउंड असलेल्या जामनेर मधून गेल्यावेळी भाजपाला ४५,५०० ची आघाडी होती ती आता ३६,६०० झाली आहे. गेल्या वेळी मंत्री महाजन राष्ट्रवादीचे संजय गरुड यांच्या विरुद्ध ३५ हजार मताधिक्याने विजयी झाले होते. गरुड आता भाजपात आले आहेत. त्यामुळे सक्षम विरोधक आज तरी महाजनांच्या समोर दिसत नाही.
मुक्ताईनगर मतदारसंघातून भाजपाला गेल्यावेळी सुमारे ६० हजाराचे मताधिक्य होते. तेव्हा एकनाथराव खडसे भाजपाचे आमदार होते. आता शिंदे गटाचे चंद्रकांत पाटील आमदार असताना भाजपाला ४७ हजाराचे मताधिक्य आहे. मात्र खडसे व आ.पाटील यांचे संबंध पाहता हे मताधिक्य नेमके कोणाचे असा प्रश्न पडतो. विधानसभेत या मतदारसंघाची स्थिती फारच अवघड असणार आहे. एकनाथराव खडसे भाजपात वेटिंगवार आहेत. विद्यमान आमदार म्हणून चंद्रकांत पाटील यांनाच युतीची उमेदवारी मिळेल. आघाडीकडून रोहिणी खडसे यांनी अगोदरच आपली उमेदवारी खुद्द शरद पवारांसमोर जाहीर करून टाकली आहे. ही लढत झाली आणि खडसे भाजपात असले तर ते युतीधर्म पाळतील का? गेल्यावेळी राष्ट्रवादीने पाटील यांना मदत केली होती, ती यावेळी नसणार. त्यामुळे पाच वर्षांच्या गुडविलवर आ.पाटील यांची मदार असणार. एकूणच ही लढत रंजक असणार एवढे नक्की.

राजकारणात शक्यतांना फारसा वाव नसतो. शिवाय राजकारण दिवसागाणिक बदलत असते. त्यामुळे चार महिन्यानंतर राजकारणाचा पोत नेमका काय राहातो? विधानसभा निवडणुका युती विरुद्ध आघाडी अशा होतात की सर्व पक्ष स्वतंत्र लढतात? या बाबी लढातींवर प्रभाव पाडणार्‍या ठरतील. लोकसभेत दुसर्‍यांसाठी मत मागणे व विधानसभेत स्वतःसाठी मते मागणे यातही बराच फरक पडतो. मात्र लोकसभा निवडणुकांनंतर आता विधानसभेचे वारे जोरदार वाहू लागले आहेत, हे मात्र खरे.

- Advertisment -

ताज्या बातम्या