अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध दारू विक्री व जुगार व्यवसायाविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मोहीम राबवत एकाच दिवशी 19 ठिकाणी धडक कारवाई केली. या कारवाईत 10 अवैध दारू विक्रेते आणि नऊ अवैध जुगार अड्ड्यांवर छापे टाकण्यात आले. या कारवाईत एकूण 19 गुन्हे दाखल करण्यात आले असून पाच लाख 60 हजार 690 रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना जिल्ह्यातील अवैध व्यवसायांची माहिती संकलित करून कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व अंमलदारांची पाच विशेष पथके तयार करण्यात आली. या पथकांना विविध भागांत माहितीच्या आधारे कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
त्यानुसार सोमवारी (27 जुलै) कोतवाली, तोफखाना, सोनई, राहुरी, कर्जत आणि बेलवंडी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत छापेमारी करण्यात आली. अवैध दारू विक्री करणार्या 10 ठिकाणांवर कारवाई करून संबंधितांविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये सोनई पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक पाच, राहुरी येथे दोन, बेलवंडी येथे दोन आणि कर्जत येथे एका गुन्ह्याची नोंद झाली. या कारवाईत अवैध दारूसह एक लाख 28 हजार 850 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याचवेळी तोफखाना, कोतवाली आणि कर्जत पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील अवैध जुगार अड्ड्यांवरही धडक कारवाई करण्यात आली. तोफखाना परिसरात चार तर कोतवाली हद्दीत चार अशा एकूण आठ ठिकाणी छापे टाकून जुगार साहित्य व रोख रकमेसह 21 हजार 270 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच कर्जत तालुक्यातील कुळधरण येथे तिरट जुगार अड्ड्यावर धाड टाकत 15 जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत जुगारासाठी वापरण्यात येणारे साहित्य, मोबाईल फोन, वाहने व रोख रकमेसह एकूण चार लाख 10 हजार 570 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.




