धुळे – प्रतिनिधी dhule
मद्यतस्कर दिनु डॉन ऊर्फ दिनेश निंबा गायकवाड याच्याकडुन तपासात महत्वाची माहिती उघडकीस आली आहे. दिनु डॉनचे नेपाळ (Nepal) मध्येही उद्योग असल्याचे समोर आले असून ते कोण कोणते आहेत, याची माहिती पोलीस घेणार आहेत. तसेच त्याच्यावर विविध पोलिसात (police) तब्बल 21 गुन्हे दाखल असून दिनू डॉन हा मध्यप्रदेश, गुजरातमधून स्पिरिट आणत होता. स्थानिक गरजुच्या मजबुरीचा फायदा घेवून राज्यात विविध ठिकाणी बनावट दारूचे कारखाने चालवीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
मद्यतस्कर ‘दिनू डॉन’ अखेर गजाआड
धुळे तालुका पोलीस ठाण्यात दाखल गुन्हयातील मुख्य फरार आरोपी दिनु डॉन ऊर्फ दिनेश निंबा गायकवाड (रा.शिरुड ता.धुळे) यास धुळे तालुका पोलीसांनी दि.२९ जून रोजी अटक केली होती. त्याला न्यायालयात हजर केले असता त्यास न्यायालयाने पोलीस कोठडी दिली. तसेच या गुन्हयात पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी दिनु डॉन याची चौकशी केली असता त्याने बनावट दारु बनविण्याकरीता राज्यात वेगवेगळया ठिकाणी बनावट दारुचे कारखाने उभारुन, बनावट दारु बनविण्याकरीता मध्य प्रदेश आणि गुजरात येथुन स्पिरीट आणि बनावट दारुसाठी लागणारा इतर कच्चा माल व साहित्य छुण्या रितीने आणुन परिसरातील स्थानिक गरजु मुलांना आणि लोकांना त्यांचे आर्थिक मजबुरीचा फायदा घेवून त्यांच्याकडुन तो बनावट दारु तयार करत असे. तयार केलेली बनावट दारु तो त्याच्या साथीदार आणि हस्तकामार्फत चंद्रपुर, गडचिरोली लातुर, परभणी, सोलापुर आणि इतर दुर्गम आणि मागास भागात अशा दारुची वाहतुक करुन छुप्या पध्दतीने विक्री करीत असल्याचे त्याने तपासात माहिती दिली.
तसेच काही गुन्हयात तो अद्याप फरार असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तसेच त्याने इतर राज्यात देखील अशाच प्रकारचे गुन्हे केले असल्याची शक्यता असल्याने त्यादृष्टीने पीआय दत्तात्रय शिंदे पुढील तपास करीत आहेत. दिनू डॉनने नेपाळ या देशात देखील काही व्यवसाय सुरु केले असल्याचे त्याने तपासात सांगितल्याने त्याने सुरु केलेल्या व्यवसाय कोणते आहेत.? त्याबाबत त्याच्याकडे सखोल तपास करण्यात येत आहे. दिनू डॉनवर तब्बल 21 गुन्हे दाखल असल्याने तपासात निष्पन्न झालेले आहे. त्यात धुळे तालुका पोलिसात 11, धुळे शहर, आझादनगर, शिरपुर शहर, जळगांव एम.आय.डी.सी.पोलीस
ठाणे, पारोळा, खुलताबाद, सायखेडा पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे. तसेच गोंड पिंपरी (चंद्रपुर) पोलीस ठाण्यात व एक्साईज पोलीस स्टेशन, नाशिक येथेही गुन्हा दाखल आहे. तसेच बऱ्याच गुन्हयात तो फरार असल्याचे देखील तपासात निष्पन्न झालेले आहे. पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे हे गुन्हयाचा तपास करीत असुन दिनू डॉनकडुन इतर राज्यात देखील अशाच प्रकारे गुन्हे केल्याबाबत तपासात उघड होण्याची शक्यता आहे.