आळेफाटा । प्रतिनिधी
पोलीस दलात भरती होऊन देशसेवेचे आणि कुटुंबाचे स्वप्न साकार करण्यासाठी जिद्दीने तयारी करणाऱ्या एका २५ वर्षीय तरुणीने अकॅडमी शिक्षकाच्या छळाला कंटाळून आयुष्य संपवल्याची अत्यंत धक्कादायक घटना आळेफाटा येथे 10 आगस्ट रोजी घडली. भाग्यश्री भास्कर भंडारी असे मयत तरुणीचे नाव असून, याप्रकरणी सह्याद्री अकॅडमीचा शिक्षक मयुर अशोक डुंबरे (रा. खामुंडी, ता. जुन्नर) याच्याविरुद्ध आळेफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाग्यश्री भंडारी ही मूळची आळकुटी (ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) येथील रहिवासी असून, आळेफाटा येथे राहून पोलीस भरतीचा सराव करत होती. मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी झालेल्या एका प्रसंगात शिक्षक मयुर डुंबरे याला पोलीस ठाण्यात जावे लागले होते. याच गोष्टीचा राग मनात धरून डुंबरे याने भाग्यश्री हिला टार्गेट करण्यास सुरुवात केली. वर्गात तसेच इतर विद्यार्थ्यांसमोर सतत अपमानास्पद वागणूक देणे आणि तिचा मानसिक छळ करणे सुरू होते. या रोजच्याच त्रासाला कंटाळून अखेर भाग्यश्रीने राहत्या खोलीत गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.
मयत भाग्यश्रीची बहीण शितल भंडारी ही स्वतः शासकीय सेवेत कार्यरत आहे. आपल्या बहिणीवर ओढवलेला हा प्रसंग पाहून त्यांनी तात्काळ कायदेशीर पावले उचलत आळेफाटा पोलिसांत फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी शिक्षक मयुर डुंबरे याच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम १०८ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून, त्याला अटकेची प्रक्रिया सुरू आहे.
ग्रामीण भागातील हजारो तरुण-तरुणी आपले भविष्य घडवण्यासाठी आळेफाटा परिसरातील खाजगी अकॅडमींमध्ये दाखल होतात. मात्र, ‘शिस्तीच्या’ गोंडस नावाखाली चालणारा मानसिक छळ आणि शिक्षकांची अरेरावी या घटनेमुळे उघडी पडली आहे. विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या अकॅडमीच जर मुलांच्या जीवावर उठणार असतील, तर पालकांनी आपल्या मुलांचा विश्वास कोणावर ठेवावा? या घटनेनंतर आळेफाटा परिसरातील अशा खाजगी अकॅडमींवर प्रशासनाने कडक नियमावली आणि अंकुश ठेवावा, अशी तीव्र मागणी आता पालकांमधून केली जात आहे.




