अकोले |प्रतिनिधी| Akole
अकोले शहरातून जाणार्या अगस्ति सहकारी साखर कारखाना रस्त्याची प्रचंड दुर्दशा झाली आहे. आमदार, खासदार, कारखाना पदाधिकारी, नगरपंचायत आदींनी आश्वासन देऊनही काम मार्गी लागत नसल्याने कारखाना रस्त्यावरील सर्वपक्षीय युवक कार्यकर्त्यांनी अभिनव आंदोलन हाती घेतले आहे.
कारखाना रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली असून धुळीने आणि रस्त्यावरील खड्ड्यामुळे या भागातील रहिवासी त्रस्त झाले आहेत. परिणामी खोकला, सर्दी, डोळे, घसा यासह मणक्याच्या आजाराने अनेक नागरिक आजारी पडत आहे. हा रस्ता व्हावा म्हणून मागील वर्षी या रस्त्यावरील युवकांनी महात्मा फुले चौकात रास्तारोको आंदोलन केले होते. अनेकवेळा कारखाना, नगरपंचायत, आजी-माजी लोकप्रतिनिधी, खासदार यांना निवेदनही दिले गेले. मागील वर्षी अगस्ति कारखान्याचे विद्यमान चेअरमन सिताराम गायकर यांनी चालू वर्षीच्या गळीत हंगामापूर्वी रस्त्याचे काम करू असे लेखी आश्वासन दिले होते. मात्र त्यावरही कोणतीही कार्यवाही झाली नाही. या रस्त्याच्या कामासाठी आमदार व खासदार यांनी 5 कोटींचा निधी दिल्याचे बोलले जात आहे. मात्र कोणी निधी आणला, त्यात किती रस्ता होणार आहे, त्याचे इस्टीमेट झाले की नाही याबाबत सर्व गोष्टी गुलदास्त्यात आहे. आणि निधी मंजूर असेल तर त्यात सर्व कारखाना रस्त्याचे काम होणार नाही मग अपूर्ण राहणार्या रस्त्याच्या कामाचे काय? असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहे.
या संदर्भात कारखाना रोड परिसरातील युवक आक्रमक झाले व त्यांनी बैठक घेत याबाबत तीव्र संतप्त प्रतिक्रिया दिल्या. या रस्त्याच्या कामासाठी मोठे आंदोलन उभे करण्याचा इशारा देत रास्ता रोको आंदोलन करून कारखाना गळीत हंगामात मोठा अडथळा निर्माण करण्याचे ठरविले आहे. बुधवारी कारखान्याच्या डिझेल पंपावर बाहेर जाणार्या वाहनामध्ये डिझेल भरू न देता तशीच वाहने काढून दिली. तसेच कारखाना प्रशासनाला निवेदनही देण्यात आले आहे. काल सर्व कारखाना रस्त्यावर सर्वपक्षीय नेत्यांचे फोटो लावून त्यांच्याबद्दल उपहासात्मक वाक्य टाकून फ्लेक्स बोर्ड लावलेले आहेत. हे फ्लेक्स बोर्ड शहर व परिसरात चर्चेचा विषय ठरले.
कारखाना रस्त्यावरील युवक कार्यकर्ते सचिन शेटे, संदीप शेणकर, बाबासाहेब नाईकवाडी, नवनाथ शेटे, भागवत शेटे, नितीन नाईकवाडी, राहुल शेटे, संदीप भानुदास शेणकर, संतोष देठे, शाम शेटे, राजू भांगरे, प्रशांत जगताप, विशाल शेणकर, विजय शेणकर, मच्छिंद्र शेणकर, सचिन जगताप, संचित कोटकर, रमेश शेटे, संभाजी शेटे यांनी आंदोलनात सहभाग घेतला आहे.