अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत झालेल्या ठरावाची नगर येथे होळी करण्यात आली. सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने राज्य सरकार व मराठा आमदारांसह सर्वपक्षीय आमदारांचा निषेध करण्यात आला. सर्वपक्षीय आमदारांनी, नेत्यांनी मराठा समाजाची फसवणूक केली आहे. ठरावात आरक्षण कधी देणार, हे स्पष्ट केले नाही. सर्वपक्षीय नेते, मराठा आमदारांनी हा ठराव फक्त स्वतःच्या संरक्षणासाठी केलेला आहे, असा आरोप करत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ नगरच्या तहसील कार्यालयासमोर सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने गेल्या तीन दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. जरांगे यांनी सरकारला अल्टिमेटम दिलेला आहे. त्यामुळे बुधवारी सकाळी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेण्यात आली. त्यात कोणताही ठोस निर्णय घेतला नाही. सरकारला आणखी वेळ देऊन जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती या ठरावाद्वारे करण्यात आली. आरक्षणाबाबत ठोस निर्णय घेण्याऐवजी कायदा व सुव्यवस्थेवर अधिक चर्चा करून कारवाई सुरू करण्यात आली. मराठा आरक्षणासाठी 25 आत्महत्या होऊनही सरकारला जाग येत नाही. सर्वपक्षीय नेत्यांनी, आमदारांनी व मराठा समाजाच्या आमदारांनीही आमची फसवणूकच केली आहे. या आत्महत्यांना सरकारच जबाबदार आहे. त्यांच्यावरच गुन्हे दाखल व्हायला पाहिजे. त्यामुळे या ठरावाच्या निषेधार्थ ठरावाच्या प्रतीची होळी करत असल्याची भूमिका यावेळी मांडण्यात आली.
दरम्यान, तहसील कार्यालयासमोर सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने आमरण उपोषण सुरू आहे. उपोषणाचा कालचा तिसरा दिवस होता. त्यामुळे शासनाचे वैद्यकीय पथक उपोषणकर्त्यांची तपासणी करण्यासाठी आले होते. मात्र, उपोषणकर्त्यांनी वैद्यकीय तपासणी करून घेण्यास व वैद्यकीय उपचार घेण्यास नकार दिला. त्यामुळे वैद्यकीय पथकाला रिकाम्या हाती परतावे लागले.
मनमाड व कल्याण महामार्गावर रास्ता रोको
मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी शहरातील सकल मराठा समाजातील युवकांनी बुधवारी (दि.1) नालेगाव जवळील नेप्ती नाका चौकात नगर-कल्याण महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करून रस्त्यावर टायर पेटवले. तसेच नगर- मनमाड रस्त्यावरील विळद (ता. नगर) येथे मराठा समाज बांधवांनी रास्ता रोको आंदोलन केले. जय भवानी जय शिवाजी…, एक मराठा लाख मराठा… अशा घोषणांनी परिसर दणाणून निघाला. आंदोलनामुळे नगर- कल्याण व नगर- मनमाड रस्त्यावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.