Friday, September 11, 2026
HomeनगरAhilyanagar : सर्वपक्षीय शोकसभेत अनेकांचा दाटून आला कंठ

Ahilyanagar : सर्वपक्षीय शोकसभेत अनेकांचा दाटून आला कंठ

पालकमंत्री विखे पाटील, माजी मंत्री थोरात यांच्यासह मान्यवरांकडून अजितदादांच्या आठवणींना उजाळा

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या कार्यकर्तृत्वाचा पूर्ण राज्यावर ठसा उमटला. त्यांच्या निधनाच्या धक्क्यातून अजूनही राज्य सावरलेला नाही. सत्तेत राहिलेले व सत्तेच्या बाहेर गेलेले अजितदादा मी जवळून पहिले आहेत. त्यांनी प्रत्येक क्षेत्रात आपला कामाचा ठसा उमटवत उत्कृष्ट काम केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही त्यांच्या कामाचा प्रभाव होता. प्रत्येकाला त्यांनी सहकार्यच केले.स्व.अजितदादांनी मांडलेल्या चांदा ते बांधा या संकल्पनेतून त्यांची पूर्ण राज्यात वेगळी ओळख निर्माण झाली. नगर जिल्ह्यावरही त्यांची विशेष मेहेर नजर होती. अशा कर्तृत्व संपन्न, नि:स्वार्थपणे मैत्री जपणारा, सुख दुखांच्या प्रसंगांना सर्वाना बरोबर घेणारा नेता आज आपल्यातून गेला आहे, असल्याची भावना पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त करत दादांना श्रद्धांजली वाहिली.

- Advertisement -

दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सोमवारी नगरमध्ये जिल्हा बँकेचे अध्यक्ष चंद्रशेखर घुले पाटील यांच्या पुढाकारातून सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन येथील यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यासह उपस्थित नेत्यांनी स्व.अजितदादा पवारांच्या अस्थी कलशास व प्रतिमेस आदरांजली वाहिली. माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आ. आशुतोष काळे, आ. संग्राम जगताप, आ. मोनिका राजळे, आ. काशिनाथ दाते, आ. हेमंत ओगले, आ. विठ्ठलराव लंघे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष घुले, व्हाईस चेअरमन माधवराव कानवडे, माजी खा. सुजय विखे पाटील, अशोक सावंत, दादाभाऊ कळमकर, शशिकांत गाडे, सचिन गुजर, माजी आमदार भानुदास मुरकुटे, राजेंद्र फाळके, माजी आ. नरेंद्र घुले, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, सर्जेराव निमसे, राहुल जगताप, अरूण कडू, लहु कानडे, संजय कोळगे, सीताराम पाटील गायकर, मधूकर नवले, कपिल पवार, अंबादास पिसाळ, आदींसह सर्व पक्षांचे पदाधिकारी व जिल्ह्यातून आलेले विविध पक्ष, संघटना व संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात म्हणाले, अवघा महाराष्ट्र नाहीतर देश स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या निधनाने हळहळला. अजितदादांच्या निधनाच्या दिवशी मी उत्तराखंडात होतो तेथेही त्यांची चर्चा होती. सहकार क्षेत्रात त्यांचा गाढा अभ्यास होता, राज्यातील सर्व सहकारी साखर कारखान्यांची त्यांना इत्तमभूत माहिती असे. एखाद्या कारखान्यात खट वाजले तरी त्यांना कळे. हीच स्थिती सर्व जिल्हा बँका व बाजार समिती बाबत होती. माझा व त्यांचा वेगळा पक्ष असला तरी कायम आम्ही बरोबर राहिलो. त्यांनी जेव्हा जेव्हा कटू निर्णय घेतले तेव्हा तेव्हा त्यांनी जनतेच्या हितालाच प्राधान्य दिले व ते ठामपणे बोलून दाखवले. असा स्पष्टोक्ता, निर्णयक्षम व अष्टपैलू असलेले अजितदादा यांच्यासारखा नेतृत्व तयार होण्यास वर्षानुवर्षाची प्रक्रिया लागते.

आ. राजळे, आ. दाते, आ. काळे, आ. ओगले, अशोक सावंत, शशिकांत गाडे, सचिन गुजर, भानुदास मुरकुटे, दादा कळमकर, नरेंद्र घुले, राजेंद्र फाळके, अण्णासाहेब म्हस्के, माधवराव कानवडे आदींनी स्वर्गीय अजितदादा पवारांच्या स्मृतीस उजाळा दिला. शेवटी आ. संग्राम जगताप यांनी कृतज्ञता व्यक्त केली व पसायदानाने शोकसभेची सांगता झाली.

चेअरमन घुले यांचा पुढाकार
काही महिन्यांपूर्वी जिल्हा बँकेच्या सहकार सभागृहात माजी आ. अरूण जगताप यांच्या निधनानंतर त्यांची, त्यानंतर जिल्हा बँकेचे चेअरमन तथा माजी आ. शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर त्यांची आणि सोमवारी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची तिसरी शोकसभा पार पडली. यावेळी जिल्हाभरातून मोठ्या संख्येने दादांवर प्रेम करणारे त्यांचे चाहते उपस्थित होते. या शोकसभेसाठी जिल्हा बँकेचे चेअरमन चंद्रशेखर घुले यांनी पुढाकार घेतला.

ताज्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकार पवार यांना ‘एस. एस....

0
नाशिक, दि. ११ सप्टेंबर २०२६ : जिमाका वृत्तसेवा Nashik सार्वजनिक प्रशासन क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशन (IIPA), महाराष्ट्र प्रादेशिक...