Thursday, December 12, 2024
Homeनाशिककरंजगाव भ्रष्टाचाराच्या चौकशीचा ठराव

करंजगाव भ्रष्टाचाराच्या चौकशीचा ठराव

निफाड | प्रतिनिधी

करंजगाव येथे जलजिवन मिशनच्या दोन कोटी रुपयांच्या सुरु असलेल्या नित्कृष्ट कामात भ्रष्ट्राचार केल्याचा आरोप ग्रामस्थांनी करत उच्चस्तरीय चौकशीचा ठराव केला आहे. करंजगावचे माजी सरपंच खंडू बोडके यांनी ग्रामसभेत याबाबत आक्रमक भूमिका घेत संबधित अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

- Advertisement -

१५ व्या वित्त आयोगाच्या कृती आराखडा बनविण्यासाठी करंजगाव ग्रामपालिकेची विशेष ग्रामसभा सरपंच प्रज्ञा नंदू निरभवने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी रस्ते, वीज, पाणी, आरोग्य या मूलभूत समस्या ग्रामस्थांनी मांडल्या. करंजगाव येथे जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने राष्ट्रीय पेयजल योजना अर्धवट स्थितीत असतानाही नवीन दोन कोटी रुपयांची जलजिवन योजना राबविण्यात येत असुन त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप खंडू बोडके व उपस्थित ग्रामस्थांनी केला.

पेयजल योजनेच्या १९ कि.मी. लांबीच्या शिवार पाईपलाईन पूर्णपणे बंद अवस्थेत असल्याने तसेच अर्धवट विहीर यांचा सुमारे एक कोटी रुपये खर्च शासनाचा वाया गेला आहे. नवीन योजनेचे चुकीचे सर्वेक्षण झाल्याने गतवर्षी खंडू बोडके यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात लेखी तक्रार केल्यानंतर चौकशी समिती नियुक्त करण्यात आली होती.

मात्र या समितीने केलेल्या शिफारशी अमलात न आणता संबधित अधिकारी व ठेकेदाराने संगनमताने योजनेत विहिरीच्या कामात वीजचोरी करून भ्रष्टाचार करुन नित्कृष्ठ दर्जाचे काम सुरु केले आहे. त्यामुळे दोन्ही योजनांची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी खंडू बोडके यांनी यावेळी केली. त्यावर सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला.

विजेच्याबाबत अनेक ग्रामस्थांनी तक्रारी मांडल्या. विविध विकासकामांच्या बाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. सरपंच नंदू निरभवणे व ग्रामविकास अधिकारी जाधव यांनी यावेळी उपस्थितांना उत्तरे दिली. ग्रामसभेत शांताराम गायकवाड, वसंत पावशे, सागर जाधव, योगेश राजोळे, गणेश गोसावी, रवींद्र लोहकरे, सुदर्शन राजोळे यांनी समस्या मांडल्या. ग्रामसभेस उपसरपंच एकनाथ गांगुर्डे, सदस्य रावसाहेब राजोळे, विलास राजोळे, नामदेव पवार, बाळासाहेब कोटकर यांच्यासह महिला सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या