Saturday, May 4, 2024
HomeUncategorizedयुती की आघाडी चर्चा तर होणारच!

युती की आघाडी चर्चा तर होणारच!

नाशिक | Nashik | दखल | विजय गिते

नाशिक महापालिकेबरोबरच (nashik municipal corporation), जिल्हा परिषद (zilla parishad) आणि पंचायत समितीच्या (panchayat samiti) निवडणुकीचे नगारे वाजायला सुरुवात झाली आहे. या निवडणुकांत भाजपा (BJP) – मनसे (MNS) युती होणार का? राज्यातील महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) फॉर्म्युल्याप्रमाणे शिवसेना (shiv sena), राष्ट्रवादी (rashtravadi) आणि काँग्रेस (congress) हे तिन्ही पक्ष एकत्र येणार? याचे चर्वितचर्वण जिल्हाभर सुरू आहे. याबाबतच्या गप्पांचा फड चौका-चौकात अन पारावर रंगू लागला आहे.

- Advertisement -

याबाबतची सर्वाधिक चर्चा ही विद्यमान सदस्य, नगरसेवक आणि इच्छुकांमध्ये सर्वाधिक असून नागरिकांनाही तितकीच उत्सुकता आहे. मनपात भाजपाला पुन्हा एकहाती सत्ता हस्तगत करायची आहे. मनसेसह शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांनाही महापालिका (municipal corporation), जिल्हा परिषद, पंचायत समितीवर आपापल्या पक्षाचा झेंडा फडकवायचा आहे. यासाठी हवं ते करायची तयारीही प्रत्येक पक्षाने ठेवली आहे.

आघाडी, युती होईल की नाही? हे काळच ठरवेल. पण, सध्या तरी सगळेच राजकीय पक्ष ’ एकला चलो…’ च्याच तयारीत दिसत आहे.आणि होणारही असेच आहे. यात काही बदल होईल, असे तरी सध्याच्या परिस्थितीवरून वाटत नाही. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काय काय होणार? याची चर्चा तर होणारच!

नाशिक महानगरपालिकेवर दोन पंचवार्षिकपूर्वी भाजपाच्या मदतीने मनसेने महापालिकेची सत्ता हस्तगत करत आपला महापौर बसवत इतिहास रचला. त्याअगोदर शिवसेना आणि भाजप युतीने एकत्रित निवडणूक (election) लढवित सत्ता मिळविलेली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीनेही सत्तेची चव चाखलेली आहे. निवडणुकीपूर्वी एकमेकांविरोधात शड्डू ठोकल्यानंतर ज्या राजकीय पक्षांमध्ये विळ्या-भोपळ्याचे नाते असते ते निवडणुकीनंतर कसे गळ्यात गळे घालून सत्तेसाठी एकत्र येतात याची उदाहरणे नाशिककरांना नवीन नाही. असे असले तरी यावेळी युती, महाविकास आघाडी की आणखी काही?

याबाबत प्रत्येकाची उत्सुकता शिगेला लागली आहे.यामागील कारणही तसेच आहे. भाजपाने दहा वर्षापासून तळागाळात पाळेमुळे रोवली आहेत. तरी देखील यंदा शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे भाजपासमोर तगडे आव्हान मनपात राहणार आहे. दुसरीकडे भाजपाचे मनसेसोबत सूर जुळू पहात आहे. मनसेने ‘एकला चलो रे ’ ची कितीही बांग दिली असली तरी सत्तेची फळे चाखण्यासाठी मनसेला कोणाशी तरी सत्तेचे सूर जुळवूनच घ्यावे लागणार आहे.

राहिली बाब शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची. राज्यातील महाविकास आघाडीचा प्रयोग नाशिक महापालिकेसाठी चालेल असे म्हणणे सध्या तरी धाडसाचे वाटते. निवडणुकी अगोदर मैत्रीपूर्ण लढती आणि निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेसाठी महाविकास आघाडीचा प्रयोग हे होणार हेही तितकेच सत्य आहे. काहीही झाले तरी या तीनही पक्षांचा प्रमुख प्रतिस्पर्धी तो म्हणजे फक्त आणि फक्त भाजपाच. यामुळे प्रचारातील रंगतही आगळीवेगळीच रंजक राहणार आहे.

शहरात तीनही पक्षांमध्ये नाही म्हणायला शिवसेनेची स्थिती मजबूत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची वेळ आलीच तर शिवसेना आपल्या ताकदीनुसार जागा मागणार.शिवाय हव्या त्याच जागांवर हक्कही सांगणार. अशा परिस्थितीत काँग्रेस राष्ट्रवादीचे काय? असा प्रश्न निर्माण होणार आहे.सत्ताधारी भाजप सध्या बलाढ्य असला तरी जागा वाटपाच्यावेळी मनाचा मोठेपणा माणसेही दाखवतील असे तूर्त तरी वाटत नाही. त्यामुळे नाशिक महापालिकेची निवडणूक युती-महाविकास आघाडी शिवायच होणार हे येथे अधोरेखित होते.

ग्रामीणचीही अशीच अवस्था हाच अध्याय जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीतही वाचला जाणार हे निश्चित आहे. शहरी भागात भाजपाचे वर्चस्व असले तरी तशी परिस्थिती मात्र ग्रामीण भागात भाजपची नाही. ग्रामीणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेचे बळ चांगले आहे. काँग्रेसबद्दल आणि त्याच्या बळाबद्दल अधिक बोलणे धाडसाचे ठरेल. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीतील त्यांचे संख्या बळ पाहता ते लक्षात येते. निवडणूक लागण्यापूर्वी युती, महाविकास आघाडी अन गट-गण आरक्षण काय आणि कसे राहणार? यावर सध्या चर्चा झडत आहेत. या चर्चेत उघडपणे बोलणारे मात्र आतून स्वबळाची, एकला चलोचीच पिपाणी आपापल्या परीने वाजवत आहेत.

जिल्ह्यातील परिस्थिती पाहता आघाडीतील तीनही पक्षांमध्ये म्हणायला राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची स्थिती मजबूत आहे. त्यामुळे महाविकास आघाडी करण्याची वेळ आलीच तर राष्ट्रवादीचे तुल्यबळ अधिक चांगले असल्याने ते अधिकच्या जागा मागणारच. शिवाय हव्या त्याच जागांवर हक्कही सांगणार मग शिवसेनेचे काय? असा प्रश्न निर्माण होतो.

आघाडीतील तिसरा पक्ष काँग्रेसची जिल्ह्यातील अवस्था बिकट आहे. त्यामुळे किती जागा त्यांच्या वाटेला येतील हे सांगणे अवघड आहे. दुसरीकडे जिल्ह्यात महाविकास आघाडी होवो की न होवो. पण आघाडीतील सर्वच तीनही पक्षांचा एक नंबर विरोधक राहणार तो म्हणजे भाजपाच. शहरी भागात भाजप सध्या कितीही बलाढ्य असला तरी ग्रामीण भागात मात्र, त्याची अवस्था तितकी चांगली नाही.आणि मनसेचे तर कुठे नामोनिशाण (गट-गणात एकही सदस्य नसल्याने) नाही.

असे चित्र असले तरी समजा महाविकास आघाडी झालीच तर उमेदवारी न मिळाल्यास आघाडीतील नाराजांची भाजपाकडे रांग लागणार हे निश्चित. यात भाजपालाही फायदेशीरच राहणार असून त्यांना आपली पाळेमुळे जिल्ह्यात अधिक घट्ट करता येणार हे निश्चित. मात्र,असे म्हणणे धाडसाचे ठरेल. कारण प्रत्येक पक्ष आपले कार्यकर्ते अन आपले बळ कायम राखण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार हे नक्की. आघाडी झाली तर उमेदवारी न मिळालेले नाराज आपसूकच भाजपाचे दार ठोठावणार. याचा फटका प्रत्येक पक्षाला बसणार. याचा सारासार विचार करता युती,आघाडी होणार की नाही? याचे उत्तर येथे आपसूकच मिळते. म्हणूनच काहीही होवो निवडणूकीपूर्वी निवडणुकीची चर्चा तर होणारच !

निकालानंतर युती-आघाड्या

यंदाची नाशिक महापालिकेची निवडणुकीत ‘कांटे की टक्कर ’ होणार यात शंका नाही. काहीही होवो सत्ता हस्तगत करायचीच असा निर्धार भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी केलेला आहे. निवडणुकीचे निकाल हाती आल्यानंतर सत्तेसाठी कोणता पक्ष कोणाशी सलगी करतो हा इतिहास आहे.

मग प्रसंगी राज्यात वेगळे चित्र असले तरी नाशिक महापालिका आणि जिल्हा परिषदेत वेगळे चित्र राहू शकते. जिंकलेल्या जागांच्या तुल्यबळानुसार महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सदस्य, स्वीकृत नगरसेवक, स्थायी समिती सभापती, अन्य विषय समित्यांचे वाटप तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, विषय समिती सभापती, पंचायत समिती सभापती,उप सभापती होतील.

त्यावेळेला खर्‍या अर्थाने युती,आघाडी वा अन्य काही चित्र दिसू शकेल. निवडणुकीसाठी मात्र काट्याचीच टकर पाहायला मिळेल. कदाचित त्यावेळेला मुख्य प्रमुख पक्षांबरोबर अन्य छोटे मोठे पक्ष संघटनांचे निवडून आलेले सदस्य, अपक्ष खर्‍या अर्थाने ‘विजेते ’ ही असू शकतील. किंबहुना हे घटक किंगमेकरची भूमिकाही बजावतील.त्यामुळे या निवडणुकीत काय चित्र राहणार हे पाहण्यासाठी घोडा मैदान जवळच आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या