नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
गेल्य दोन ते अडीच वर्षात महाराष्ट्रात प्रचंड राजकीय उलथापालथ पहायला मिळाली आहे. सत्तासंघर्षाच्या पहिल्या अंकाची सुरुवात राज्यातील सर्वात मोठा प्रादेशिक पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवसेने पासून झाली आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील फुटीचा बळी पडला. शिवसेनेतील प्रबळ नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत थेट पक्षावर दावा केला. त्यानंतर अजित पवारांनी देखील तोच पत्ता गिरवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा केला.
गेल्या काही दिवसांपासून आपण राजकीय पक्षांच्या नावाचा वाद पाहिला आहे. पण, लोकसभा सचिवालयाने कार्यालयांचे वाटप करताना पक्षांच्या नावाचा जो उल्लेख केला, त्यावरुन अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीतील निकालानंतर या दोन्ही पक्षांना धक्का बसला आणि शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील नव्या पक्षांनी दमदार कामगिरी केली. या कामगिरीचा परिणाम आता लोकसभेत पाहायला मिळत असून लोकसभा सचिवालयाने कार्यालयांचे वाटप करताना शरद पवार यांच्या पक्षाचा उल्लेख राष्ट्रवादी काँग्रेस असा केला आहे, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा उल्लेख शिवसेना शिंदे असा केला आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवार यांचाच गट हा मुळ राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा निकाल दिला होता. तर शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाला राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार असे नाव देण्यात आले होते. पण लोकसभेच्या निवडणुकांत शरद पवारांच्या पक्षाने अजित पवारांच्या गटा पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवला होता. शरद पवारांनी ८ जागांवर तर अजित पवार गटाने अवघ्या एका जागेवर विजय मिळवला होता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, कार्यालयांच्या यादीत लोकसभा सचिवालयाने शरद पवारांच्या पक्षाचा उल्लेख नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी अर्थात एनसीपी असाच केला आहे. राष्ट्रवादीचे हेच मूळ नाव आहे. आणि फुटीनंतर ते अजितदादांच्या पक्षाला मिळाले होते. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, असे नाव शरद पवारांच्या पक्षाला दिले होते.
दुसरीकडे, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने आमच्या पक्षाचा उल्लेख शिवसेना असाच करावा, यासाठी आग्रही असतात. मात्र लोकसभा सचिवालयाने त्यांना कार्यालय देताना त्यांचा उल्लेख शिवसेना शिंदे असा केला. शिंदेंच्या शिवसेनेला जुन्या संसद भवनात १२८ क्रमांकाचे दालन, तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला १२८ A हे दालन देण्यात आले आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा