हैदराबाद । Hyderabad
अभिनेता अल्लू अर्जुनला ‘पुष्पा २’च्या प्रिमियरमध्ये चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी शुक्रवारी (१३ डिसेंबर २०२४) पोलिसांनी त्याच्या घरातून अटक केली होती. त्याला नामपल्ली कोर्टात हजर करण्यात आलं होतं.
कोर्टाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर अभिनेत्याने तेलंगणा हायकोर्टात धाव घेतली होती. दोन्ही बाजूंचे युक्तीवाद ऐकल्यानंतर त्याला कोर्टाने चार आठवड्याचा अंतरिम जामीन मंजूर केला.
मात्र अल्लू अर्जुनला एक रात्र चंचलगुडा मध्यवर्ती कारागृहात घालवावी लागली. आज सकाळी त्याची सुटका करण्यात आली. त्यानंतर अल्लू अर्जुनने अटक प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
मी कायद्याचे पालन करणारा नागरिक आहे. कायद्याचा मी सन्मान करतो. मी यंत्रणेला पूर्णपणे सहकार्य करणार आहे. त्या दुर्घटनेत ज्या महिलेचा मृत्यू झाला, त्या महिलेबाबत मी दु:ख व्यक्त करतो. मी त्या कुटुंबाच्या दु:खात सहभागी आहे. ती दुर्घटना फार दुर्दैवी होती.
आम्ही चित्रपट पाहायला गेलो होतो. घडलेली दुर्घटना ही मुद्दामहून घडवून आणलेली नव्हती. त्यामागे कोणताही हेतू नव्हता. दुर्दैवी अपघात झाल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला. घडलेल्या दुर्घटनेबाबत आम्हाला दु:ख आहे. आम्ही त्याबाबत क्षमा मागतो, अशी प्रतिक्रिया अल्लू अर्जुनने दिली.