अकोले |प्रतिनिधी| Akole
अकोले तालुक्यातील अंबड येथील शेतकरी बबन बाळाजी भोर यांच्या सर्वे नंबर 171 मधील वस्तीलगत जनावरांच्या गोठ्यातील जर्सी कालवडीवर बिबट्याने मध्यरात्री हल्ला करून जागीच ठार केल्याची घटना घडली.
गावठाण हद्दीलगत राहत असलेल्या बबन बाळाजी भोर यांच्या वस्तीलगत असलेल्या गोठ्यात दोन गाई व दोन कालवडी बांधलेल्या असताना रात्री दीड वाजेच्या सुमारास जर्सी कालवडीवर अंधारात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला चढवला. त्यामुळे शेजारी असणाऱी जनावरं घाबरलेल्या अवस्थेत तडफडत होती. बिबट्याने कालवडीला तोंडात पकडून खूप वेळा ओढण्याचा प्रयत्न केला परंतु गळ्यात व खुट्याला बांधलेला कासरा न तुटल्यामुळे कालवडीला ओढून नेण्यात बिबट्या अपयशी ठरला.
त्यानंतर बिबट्याने कालवडीचा मागचा भाग जागेवर बसून ओरबाडून खाल्ला व तेथून अंधारात धूम ठोकली. पहाटे उठल्यावर नेहमीप्रमाणे गाईची धार काढण्यासाठी ते गोठ्यात गेले. त्यावेळी त्यांना कालवड रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत पडलेली दिसली. बाजूला रक्ताने माखलेले बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले. वनविभागाचे वनरक्षक काकड यांना दूरध्वनीवरून घटनेची माहिती दिली असता त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मृत कालवडीचा पंचनामा केला.
यावेळी शेतकर्याला जास्तीत जास्त मदत मिळावी, अशी मागणी गावचे उपसरपंच नाथा भोर, ग्रामस्थ संदीप भोर, बबन भोर, बादशहा भोर, माधव जाधव, बाळचंद भोर यांनी वनविभागाकडे केली आहे. मागील महिन्यात एक दोन ठिकाणी बिबट्याने हल्ले करून शेळ्या बकर्यांना आपले लक्ष्य केले, त्यामुळे शेतकर्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. भर लोकवस्तीत रात्रीच्या वेळी बिबट्याचा मुक्त संचार वाढला असून नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे वनविभागाने तातडीने पिंजरा लावावा, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.