Wednesday, February 4, 2026
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्र्यांच्या सभेआधी गोळीबार! भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर चार राऊंड फायर

मुख्यमंत्र्यांच्या सभेआधी गोळीबार! भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर चार राऊंड फायर

मुंबई । Mumbai

ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ शहरात मंगळवारी मध्यरात्री गोळीबाराची एक धक्कादायक घटना घडली. अंबरनाथ नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजप उमेदवार पवन वाळेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयावर अज्ञातांनी गोळीबार केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज शहरात जाहीर सभा होणार असतानाच ही घटना घडल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथ पश्चिमेकडील नवीन भेंडी पाडा परिसरात भाजप उमेदवार पवन वाळेकर यांचे कार्यालय आहे. मंगळवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास वाळेकर आपल्या कार्यकर्त्यांसह आगामी निवडणुकीच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या नियोजनासाठी बैठकीत व्यस्त होते. सीसीटीव्ही फुटेजमधील नोंदीनुसार, रात्री १२ वाजून १७ मिनिटांनी पांढऱ्या रंगाचा कुर्ता-पायजमा घातलेले दोन तरुण दुचाकीवरून कार्यालयाबाहेर आले.

YouTube video player

ओळखी पटू नये म्हणून दोघांनीही हेल्मेट घातले होते. दुचाकीवर मागे बसलेल्या व्यक्तीने अचानक रिव्हॉल्व्हर काढून कार्यालयाच्या दिशेने चार फैरी झाडल्या. गोळीबाराचा आवाज ऐकून कार्यालयातील एक कार्यकर्ता बाहेर आला आणि त्याने पळून जाणाऱ्या आरोपींचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हल्लेखोरांनी त्या कार्यकर्त्याच्या दिशेनेही एक गोळी झाडली आणि तेथून पळ काढला. हा संपूर्ण थरार अवघ्या १६ सेकंदात घडला.

ठाणे जिल्हा हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो, तर अंबरनाथ हा भाग खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात येतो. अशा संवेदनशील आणि महत्त्वाच्या भागात, त्यातही नगरपरिषद निवडणुकीच्या तीन दिवस आधी असा प्रकार घडल्याने कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अंबरनाथ नगरपरिषदेसाठी २० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.

सुदैवाने या गोळीबारात कोणीही जखमी झाले नाही. हल्लेखोरांनी गोळ्या झाडताना कोणतीही घोषणाबाजी केली नाही किंवा कोणाला वैयक्तिक लक्ष्य केले नाही. या गोळ्या कार्यालयाच्या काचेवर लागल्या आहेत. त्यामुळे हा हल्ला केवळ भीती निर्माण करण्यासाठी किंवा निवडणुकीच्या वातावरणात दहशत पसरवण्यासाठी केला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

घटनेची माहिती मिळताच अंबरनाथ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. आज १७ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अंबरनाथमध्ये सभा नियोजित आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर शहरात आधीच मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असताना ही घटना घडल्याने परिसरात तणावाचे वातावरण आहे.

ताज्या बातम्या

Nashik Fire News : सिन्नरच्या माळेगाव एमआयडीसीतील कारखान्याला भीषण आग

0
सिन्नर | वार्ताहर | Sinnar तालुक्यातील माळेगाव एमआयडीसी (Malegaon MIDC) परिसरातील मोहदरी वन उद्यानाजवळ असलेल्या “विमा ॲरोमॅटिक्स” या कंपनीला आज अचानक भीषण आग (Fire) लागल्याची...