अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
महापालिकेत स्वीकृत नगरसेवक पदांसाठी फक्त 6 जागा आहेत. त्यावर कोणाची वर्णी लागणार हे आज गुरूवारी (26 फेब्रुवारी) दुपारी 12 वाजता मनपाच्या महासभेत स्पष्ट होणार आहे. नुकत्याच झालेल्या मनपा निवडणुकीत प्रमुख 24जण पराभूत झाले आहेत. तर स्वीकृत नगरसेवक होण्याच्या आशेने तब्बल 23जणांनी आपल्याकडे मनपाची कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र (नो ड्यूज) घेऊन तयारी केली आहे. अशा स्थितीत स्वीकृतचे लाभार्थी कोण व त्यांची मुदत 1 वर्षासाठी, सव्वा वर्षासाठी की पाच वर्षांसाठी… याचे स्पष्टीकरण आजच स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, मनपाच्या स्थायी समिती व महिला-बालकल्याण समितीच्या सदस्यपदासाठी नगरसेवकांनी त्यांच्या नेत्यांकडे लॉबिंग सुरू केले आहे. त्यामुळे या समित्यांमध्ये कोण गेले आहे, हेही आज दुपारी 1 वाजता मनपा महासभेत स्पष्ट होणार आहे. आज सकाळी 11 वाजता स्वीकृत सदस्य निवडीसाठी व 12 वाजता स्थायी समिती आणि महिला व बालकल्याण समिती सदस्यांच्या निवडीची सभा महापौर ज्योती गाडे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
यात स्वीकृत सदस्य पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून 3, भाजपकडून 2 व शिवसेनेकडून एक नाव गटनेत्यामार्फत सुचवले जाणार आहे. तिन्ही पक्षांकडे इच्छुकांची संख्या मोठी असून, तब्बल 23 जणांनी नो ड्यूज घेतल्याची नोंद मनपाच्या विविध विभागात आहे. तिन्ही पक्षांनी मात्र अद्यापही नावे जाहीर केलेली नसून, आज सभेतच ही नावे स्पष्ट होणार आहेत.




