Saturday, April 11, 2026
HomeनगरAMC : मनपातील स्वीकृत नगरसेवकांवर 26 फेब्रुवारीला शिक्कामोर्तब

AMC : मनपातील स्वीकृत नगरसेवकांवर 26 फेब्रुवारीला शिक्कामोर्तब

इच्छुकांमध्ये जोरदार लॉबिंग || सव्वा-सव्वा वर्ष फॉर्म्युल्याची चर्चा

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

महापालिकेत आता महापौर व उपमहापौर हे दोन मुख्य पदाधिकारी निवडल्यानंतर आता स्वीकृत नगरसेवक पदांवर कोणाची वर्णी लागते, याची ओढ लागली आहे. यासाठीचा मुहूर्त 26 फेब्रुवारीचा जाहीर झाल्याने इच्छुक उत्साहीत झाले आहेत. यावर मनपा निवडणुकीत पराभूत झालेले पावन करून घेतले जातात की सामाजिक क्षेत्रातील चांगल्या चेहर्‍यांना संधी मिळते याची उत्सुकता आहे. याशिवाय, स्वीकृत नगरसेवक पद महापौर-उपमहापौर पदांप्रमाणे सव्वा-सव्वा वर्षांसाठी असणार की पूर्ण पाच वर्षांसाठी याचीही उत्सुकता आहे.

- Advertisement -

महापालिकेच्या स्वीकृत सदस्य तसेच स्थायी समिती व महिला बालकल्याण समितीच्या सदस्यांच्या निवडी विशेष सभेत केल्या जाणार आहेत. दोन्ही समित्यांमध्ये प्रत्येकी 16 सदस्य नियुक्त केले जाणार आहेत. त्यासाठी येत्या 26 फेब्रुवारीला महापालिकेच्या दोन विशेष सभा बोलावण्यात आल्या आहेत. दोन्ही समित्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपचे प्रत्येकी 12 सदस्य, तर शिवसेनेचे चार सदस्य नियुक्त होणार आहेत. यासाठी सत्ताधारी राष्ट्रवादी-भाजपच्या इच्छुकांनी नेत्यांकडे लॉबिंग सुरू केले आहे. महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे 27 व भारतीय जनता पक्षाचे 25 नगरसेवक आहेत.

तसेच शिंदे शिवसेनेचे 10, काँग्रेसचे 2, एमआयएमचे 2, बसपा 1 व शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष 1 असे संख्याबळ आहे. सदस्य संख्या व विषय समितीच्या सदस्य संख्येनुसार 4.25 मूल्यांकन आहे. या आधारावर स्थायी समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे 6, भारतीय जनता पक्षाचे 6, शिवसेनेचे 2, तसेच काँग्रेस व एमआयएमचा प्रत्येकी 1 सदस्य नियुक्त होणार आहे. महिला व बालकल्याण समितीमध्येही असेच संख्याबळ असेल. 26 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता समिती सदस्य व दुपारी 12 वाजता स्वीकृत सदस्य निवडीची सभा होईल. यात संबंधित पक्षाच्या गटनेत्यांकडून सदस्यांच्या नावांची शिफारस केली जाईल व त्यानुसार नियुक्त्या केल्या जातील.

स्थायी समिती व महिला बालकल्याण समिती सदस्यांच्या निवडी झाल्यानंतर स्थायी समिती सभापती व महिला बालकल्याण समितीचे सभापती व उपसभापती निवडीसाठी निवडणुकीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात येईल. विभागीय आयुक्तांकडून निवडणुकीसाठी सभेची तारीख जाहीर झाल्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊन निवडणूक पार पडणार आहे.

ताज्या बातम्या

संपादकीय : ११ एप्रिल २०२६ – कर्तव्य कठोरतेचा राजकीय अडथळा

0
एखादा अधिकारी जनतेला हवाहवासा वाटत असताना प्रशासकीय यंत्रणेचे सूत्रसंचालन करणार्‍यांना मात्र नकोसा का होतो, या प्रश्नाचे उत्तर अवघड नाही. ज्या प्रश्नाचे उत्तर सर्वविदीत असूनही...