अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
महापालिकेच्या स्थायी समितीत मंजूर केलेले 2025-26 चे अंदाजपत्रक (बजेट) आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी आज महासभेत मांडून त्यास मंजुरी दिली. गतवर्षीपेक्षा शंभर कोटींनी बजेटमध्ये वाढ झाली. सुमारे एक हजार 680 कोटींचे बजेट सादर करण्यात आले. यामध्ये आयुक्त डांगे यांनी महापालिकेच्या उत्पन्न वाढीवर भर दिल्याचे दिसून येते. पाणीपट्टी वाढ करण्यात आली असून, छुप्या मालमत्ता शोधून मनपाचे उत्पन्न वाढविण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. दरम्यान, शहरात नोकरी वा शिक्षणासाठी येणार्या महिला व मुलींसाठी वर्किंग वुमेन्स होस्टेल उभारणे, शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता फेज- 4 पाणी योजना सुमारे 495 कोटी रुपये खर्चून राबवली जाणार आहे.
महापालिकेची स्थायी समितीची सभा बुधवारी आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. याप्रसंगी उप आयुक्त विजयकुमार मुंडे, सहायक आयुक्त निखील फराटे, सपना वसावा, प्रियंका शिंदे, मुख्य व लेखा वित्त अधिकारी सचिन धस, नगरसचिव मेहेर लहारे आदी उपस्थित होते. महापालिकेत पदाधिकार्यांची मुदत संपल्यानंतर दुसर्यांदा प्रशासक म्हणून आयुक्तांनी अर्थसंकल्प मांडला. स्थायी समितीत चर्चा झाल्यानंतर आयुक्त डांगे यांनी बुधवारी मुख्यलेखाधिकारी डॉ.सचिन धस यांनी महासभेत एक हजार 680 कोटींचे वार्षिक अंदाजपत्रक महासभेचे अध्यक्ष तथा प्रशासक डांगे यांच्याकडे सादर केले. त्यास आयुक्त डांगे यांनी मंजुरी दिली.
दरम्यान अर्थसंकल्पामध्ये महसुली उत्पन्नामध्ये संकलित करात दहा कोटींची वाढ दाखविली आहे. जीएसटी अनुदानामध्येही दहा कोटींची वाढ असून, पाणीपट्टीच्या उत्पन्नातही वाढ होण्याची शक्यता आहे. तर महसुली अनुदानात तीन कोटींची वाढ दाखविण्यात आली आहे. शहरात राबविण्यात येणार्या योजनांसाठी महापालिका राष्ट्रीयीकृत बँकाकडून कर्ज घेण्यात येणार आहे. गतवर्षीचे एक हजार 560 कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. यंदा त्यात वाढ करून एक हजार 680 कोटींचा अर्थसंकल्प मांडण्यात आला. अंदाजपत्रकात महसुली उत्पन्न 452 कोटी 3 लाख, भांडवली जमा एक हजार 159 कोटी पाच लाख अंदाजित आहे. महसुली उत्पन्नात संकलीत करापोटी 103 कोटी 80 लाख, संकलीत करावर आधारीत करापोटी 58 कोटी 70 लाख, जीएसटी अनुदान 140 कोटी 67 लाख व इतर महसुली अनुदान 18 कोटी, गाळा भाडे 3 कोटी 82 लाख, पाणीपट्टी 30 कोटी, मिटरव्दारे पाणी पुरवठापोटी 10 कोटी, संकीर्णे 30 कोटी इ. महत्वाच्या बाबी आहेत.
प्रस्तावित कामे
नेहरू मार्केट विकसित करणे, प्रोफेसर कॉलनी चौक येथील शॉपिंग कॉम्प्लेक्स विकसित करणे, सर्जेपुरा रंगभवन येथे नाट्यगृह व शॉपिंग कॉम्प्लेक्स विकसित करणे, नोकरी करणार्या एकल महिलांसाठी वसतिगृह, पीएम ई बस कार्यन्वित करणे, शहर पाणीपुरवठा योजना, 35 मेगा वॉट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभा करणे, सारसनगर येथे स्पोर्टस कॉम्प्लेक्स, जिल्हा ग्रंथालय निर्मिती, भुयारी गटार योजना आदी कामे प्रस्तावित आहे.
असा होणार खर्च
वेतन, भत्ते व मानधन 170 कोटी 64 लाख, पेन्शन 54 कोटी, पाणी पुरवठा वीज बिल 40 कोटी, स्ट्रीट लाईट वीज बील 8 कोटी, शिक्षण विभाग वेतन हिस्सा 6 कोटी, महिला व बाल कल्याण योजना 3 कोटी 25 लाख, अपंग पुनर्वसन योजना 3 कोटी 25 लाख, मागासवर्गीय कल्याणकारी योजना 8 कोटी 41 लाख, औषधे व उपकरणे 1 कोटी 70 लाख, कचरा संकलन व वाहतूक 18 कोटी 50 लाख, पाणीपुरवठा साहित्य खरेदी व दुरुस्ती 1 कोटी 70 लाख, टँकरद्वारे पाणीपुरवठा 2 कोटी 75 लाख, अशुध्द पाणी आकार 4 कोटी, विविध वाहने खरेदी 3 कोटी, नवीन रस्ते 300 कोटी, रस्ते दुरुस्ती 3 कोटी, इमारत दुरुस्ती 55 लाख, शहरातील ओढ नाले साफसफाई 45 लाख, आपत्कालीन व्यवस्थापन 50 लाख, कोंडवाड्यावरील खर्च 12 लाख, वृक्षारोपण एक कोटी, हिवताप प्रतिबंधक योजना 60 लाख, कचरा डेपो सुधारणा व प्रकल्प उभारणी 1 कोटी 16 लाख, मोकाट कुत्री व जनावरे बंदोबस्त 95 लाख, मालमत्ता सर्वेक्षण 10 कोटी, मृत जनावरे विल्हेवाट प्रकल्प 35 लाख, भविष्य निर्वाह निधी तूट 2 कोटी 50, बेवारस प्रेत विल्हेवाट 40 लाख, उद्यान दुरुस्ती 25 लाख.