अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
महापालिका निवडणुकीत आमदार संग्राम जगताप व माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरूध्द बंडखोरीच्या विचारात असलेल्यांना माघार घेण्याच्या केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देणारांना दिलेल्या शब्दाला जागत या दोन्ही नेत्यांनी राष्ट्रवादी-भाजप युतीचे पाच स्वीकृत नगरसेवक निश्चित केले. मनपाच्या गुरूवारी (26 फेब्रुवारी) झालेल्या महासभेत विकास उर्फ विकी जगताप, रेवणनाथ पवार व बाबासाहेब नागरगोजे यांना राष्ट्रवादीने तर रवींद्र बारस्कर व विशाल नाकाडे यांना भाजपने स्वीकृत नगरसेवक केले. दरम्यान, शिंदे सेनेच्या स्वीकृत नगरसेवकपदाची जागा रिक्त राहिली. त्यांच्या गटनेत्याने सुचवलेले उमेदवार आदेश जाधव यांची कागदपत्रे अपूर्ण असल्याने त्यांना पुढच्या महासभेपर्यंत त्याची पूर्तता करण्याचे आदेश दिले गेले आहेत.
पाचही स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीनंतर महापौर ज्योती गाडे यांच्या हस्ते त्यांना नगरसेवक पदाचे प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी उपमहापौर अॅड. धनंजय जाधव, आयुक्त यशवंत डांगे आदी उपस्थित होते. नगरसेवकांच्या समर्थकांनी ढोल-ताशा व डीजेच्या दणदणाटात गुलाल उधळत व नव्या नगरसेवकांचे फोटो झळकावत मनपात आनंदोत्सव साजरा केला व त्यांच्या मिरवणुकाही जल्लोषात निघाल्या.
मनपाच्या स्वीकृत नगरसेवकपदी कोणाची वर्णी लागते याची उत्सुकता होती. त्यामुळे या निवडीसाठीच्या महासभेकडेही लक्ष लागले होते. राष्ट्रवादी व भाजपचे कार्यकर्ते व स्वीकृत नगरसेवकांच्या समर्थकांची मनपात गर्दी झाली होती. राष्ट्रवादीचे गट नेते प्रकाश भागानगरे, भाजपच्या गट नेत्या शारदा ढवण व शिंदे सेनेचे गट नेते दत्ता कावरे यांनी त्यांच्या कोट्यानुसार त्यांची नावे महापौर गाडे यांच्याकडे दिली. ती नावे त्यांनी जाहीर केली. त्यानंतर आयुक्त डांगे यांनी या नावांच्या प्रस्तावांच्या छाननीची प्रक्रिया केली व शिंदे सेनेच्या उमेदवाराची कागदपत्रे अपूर्ण असल्याचे स्पष्ट करीत ती जागा रिक्त राहिल्याचे जाहीर केले.
दोन कागदपत्रे अपूर्ण
शिंदे सेनेने सुचवलेले आदेश जाधव यांचे नाव अधिकृतपणे जाहीर केले गेले नाही. गट नेत्याने सुचवलेले हे नाव सांगितले गेले. पण आयुक्तांच्या छाननीत ते बाद ठरले. अपत्य शपथपत्र तसेच स्थावर व जंगम मालमत्ता शपथपत्र या उमेदवाराने प्रस्तावास जोडले नसल्याने त्यांचे नाव तात्पुरते रद्द केले गेले. त्यांना पुढच्या महासभेपर्यंत अपूर्ण कागदपत्रे जमा करण्यास मुदत दिली गेली आहे. तोपर्यंत हे पद रिक्त राहणार आहे.
दोन्ही विषय समित्यांवर अनुभवींना मिळाली संधी
महापालिकेच्या स्थायी समिती व महिला आणि बालकल्याण समितीमध्ये अनुभवी नगरसेवकांना संधी मिळाली आहे. त्यामुळे या बड्या नगरसेवकांपैकी कोणाला सभापती पदाची संधी मिळते याची उत्सुकता वाढली आहे. मनपाच्या गुरूवारी (26 फेब्रुवारी) झालेल्या विशेष सभेत स्थायी समिती आणि महिला व बालकल्याण समितीच्या प्रत्येकी 16 सदस्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. राष्ट्रवादी अजितदादा गटाचे गट नेते प्रकाश भागानगरे, भाजपच्या गट नेत्या शारदा ढवण, शिंदे सेनेचे गट नेते दत्ता कावरे, एमआयएमचे गट नेते सय्यद शहाबाज व काँग्रेसचे गटनेते शम्स खान यांनी त्यांच्या पक्षाच्या कोट्याप्रमाणे दोन्ही समित्यांवरील नगरसेवक सदस्यांची नावे महापौरांकडे दिली. त्यानंतर त्यांनी ती जाहीर केली.
या यादीनुसार स्थायी समितीचे राष्ट्रवादीचे सदस्य असे – गौरी बोरकर, हरप्रीतकौर गंभीर, सुरेश बनसोडे, संध्या पवार मीना चोपडा व पौर्णिमा गव्हाळे. भाजपचे सदस्य असे – सुभाष लोंढे, बाबासाहेब वाकळे, निखिल वारे, मनोज दुल्लम, मनोज कोतकर व सोनाबाई शिंदे. शिंदे सेनेचे सदस्य असे- नवनाथ कातोरे व सुनिता गेनप्पा. एमआयएमच्या सदस्य अशा- शेहनाज शेख आणि काँग्रेस सदस्य- मिनाज खान.
तर, महिला व बालकल्याण समितीवर राष्ट्रवादीच्या दिपाली बारस्कर, सुनिता भिंगारदिवे, अनिता शेट्टीया, काजल भोसले, सुनिता कांबळे, अश्विनी लोंढे. भाजपच्या वंदना ताठे, शितल ढोणे, पुष्पा बोरूडे, आशाबाई कातोरे, रोशनी त्रिंबके, वर्षा सानप. शिंदे सेनेच्या मंगल लोखंडे व रूपाली दातरंगे. काँग्रेसच्या खान मीनाज जाफर, एमआयएमचे शेख शेहनाज खालिद यांना संधी देण्यात आली.




