Saturday, September 26, 2026
HomeनगरAMC Election : उमेदवारी अर्जांची विक्री तेजीत, प्रत्यक्ष दाखल केवळ एकच

AMC Election : उमेदवारी अर्जांची विक्री तेजीत, प्रत्यक्ष दाखल केवळ एकच

दोन दिवसांत 1,164 अर्जांची विक्री

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारपासून (23 डिसेंबर) उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात झाली असून पहिल्या दोन दिवसांत अर्ज खरेदीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली. मात्र, प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याबाबत मात्र संथगती दिसून येत असून दोन दिवसांत केवळ एकाच इच्छुक उमेदवाराने दोन अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान, मंगळवार व बुधवार या दोन दिवसांत एकूण एक हजार 164 उमेदवारी अर्जांची विक्री झाल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

- Advertisement -

महापालिका निवडणुकीसाठी 17 प्रभागांकरिता प्रभागनिहाय सहा निवडणूक कार्यालयांची स्थापना करण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी या कार्यालयांतून तब्बल 780 अर्जांची विक्री झाली. अर्ज खरेदीसाठी इच्छुक उमेदवारांची झुंबड उडाल्याचे चित्र होते. दुसर्‍या दिवशीही हीच परिस्थिती कायम राहिली असून त्या दिवशी सहा कार्यालयांतून 384 अर्जांची विक्री करण्यात आली. या दोन दिवसांत इच्छुक उमेदवारांकडून प्रामुख्याने अर्ज खरेदी करून आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यावर भर देण्यात येत असल्याचे दिसून आले. दरम्यान, आज (गुरूवार) नाताळ सणामुळे उमेदवारी अर्ज भरण्यास सुट्टी देण्यात आली असून रविवारी (28 डिसेंबर) सुट्टी असल्याने त्या दिवशीही अर्ज दाखल करता येणार नाहीत.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 30 डिसेंबरपर्यंत असल्याने इच्छुक उमेदवारांच्या हाती आता केवळ चार दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे येत्या चार दिवसांत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. पहिल्या दोन दिवसांत दाखल झालेला एकमेव उमेदवारी अर्ज प्रभाग क्रमांक पाच (ब) मधून आहे. धनंजय कृष्णा जाधव यांनी या प्रभागातून दोन उमेदवारी अर्ज दाखल केले असून त्यातील एक अर्ज भारतीय जनता पक्षाकडून तर दुसरा अर्ज अपक्ष म्हणून दाखल करण्यात आल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे. यामुळे दोन दिवसांत केवळ एकाच इच्छुकाने उमेदवारी अर्ज दाखल केल्याची नोंद झाली आहे.

इच्छुकांचा जीव टांगणीला
एकीकडे उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असताना दुसरीकडे शहरातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. महायुती व महाविकास आघाडीच्या बैठका सुरू असून इच्छुक उमेदवारांमध्ये जोरदार चर्चा रंगू लागल्या आहेत. युती व आघाडी मिळून सुमारे एक हजारांहून अधिक इच्छुक उमेदवार असल्याची चर्चा आहे. काही इच्छुकांनी आपल्याला पक्षाची उमेदवारी मिळणार असल्याच्या अपेक्षेने प्रचारालाही सुरूवात केली आहे. मात्र, अद्याप कोणत्याही पक्षश्रेष्ठीकडून अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही. शेवटच्या क्षणापर्यंत ताणाताणी होणार असण्याची शक्यता आहे. महायुतीच्या तिन्ही पक्षात प्रत्येक प्रभागात इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे कोणाला पक्षाचे तिकीट मिळणार व कोणाला नाही मिळणार याची चर्चा झडत आहे. दुसरीकडे युती व आघाडींच्या बैठका होतात मात्र निर्णय जाहीर केला जात नसल्याने इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे.

ताज्या बातम्या

Nashik News : दुष्काळसदृश परिस्थितीतील शेतकऱ्यांना विविध सवलतींचा लाभ देण्यासाठी यंत्रणेने...

0
नाशिक | Nashik खरीप हंगाम-२०२६ मध्ये पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करून नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) १० तालुक्यांत प्रथम कळ (Trigger-1) लागू करण्यात आला आहे....