अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
अहिल्यानगर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत अर्ज भरण्याच्या शेवटच्या (मंगळवार, 30 डिसेंबर) दिवशी शहराच्या राजकारणात मोठ्या प्रमाणावर उलथापालथ पाहायला मिळाली. महायुतीतून शिवसेना शिंदे गट बाजूला झाल्याने ऐनवेळी त्यांच्या पक्षाकडून अनेकांनी उमेदवारी पदरात पाडून घेत अर्ज दाखल केली. पक्षांतर, बंडखोरी, उमेदवारी नाकारल्याने निवडणूक रंगतदार बनली आहे. दरम्यान, भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) अशी युती, शिवसेना (शिंदे गट) आणि महाविकास आघाडी (काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट व शिवसेना ठाकरे गट) अशी तिरंगी लढत होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. युतीने 66 जागेवर, शिंदे सेनेने 54 जागेवर तर महाविकास आघाडीने 68 जागेवर उमेदवार दिले आहेत. आज (बुधवार) छाननी आणि 1 व 2 जानेवारी 2026 रोजी माघारीची मुदत आहे. माघारीनंतर चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.
भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी असल्याने अनेकांना उमेदवारी नाकारण्यात आली. सोमवारी रात्री शिवसेना शिंदे गट महायुतीतून बाहेर पडताच नाराज उमेदवारांचा मार्ग मोकळा झाला. उमेदवारी मिळणार नसल्याचे स्पष्ट होताच अनेकांनी थेट शिवसेना शिंदे गटाशी संपर्क साधत अर्ज दाखल केले. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी व महापालिकेचे प्रथम महापौर भगवान फुलसौंदर यांनी अखेर मशाल सोडून राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हाती घेतले आहे. प्रभाग 14 मधून त्यांच्या पत्नी सुनीता फुलसौंदर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आमदार संग्राम जगताप यांच्या पत्नी व माजी नगरसेविका शीतल जगताप यांच्या जागी त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अमित खामकर यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ काढून टाकत ऐनवेळी शिवसेना शिंदे गटाचा धनुष्यबाण स्वीकारला. शेवटच्या काही मिनिटात त्यांनी उमेवारी अर्ज दाखल केला. भाजपचे माजी नगरसेवक नितीन शेलार व माजी नगरसेविका संगीता खरमाळे यांनीही कमळ सोडून धनुष्यबाण हाती घेत उमेदवारी अर्ज दाखल केला.
आमदार संग्राम जगताप यांचे समर्थक अभिजित भिंगारदिवे यांनी प्रभाग 13 मधून, तर प्रभाग 17 मधील माजी नगरसेविका गौरी गणेश नन्नवरे यांनी भाजपला रामराम ठोकत शिवसेना शिंदे गटातून अर्ज भरला आहे. स्व. माजी आमदार अनिल राठोड यांचे चिरंजीव विक्रम राठोड यांनी पत्नी अपक्ष लढणार असल्याची पोस्ट काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल केली होती. त्यानंतर त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. मात्र, अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी कोणताही उमेदवारी अर्ज न भरल्याने ते निवडणूक रिंगणाबाहेर राहिले. महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते व ज्येष्ठ नगरसेवक विनीत पाऊलबुध्दे यांनी प्रभाग दोनमधून निवडणुकीतून माघार घेतली. प्रभाग एकमधून उद्योजक शिवाजी चव्हाण यांच्या पत्नी मीना चव्हाण यांनीही माघार घेतली असून त्यांच्या जागी नव्या उमेदवाराला संधी देण्यात आली आहे. माजी नगरसेवक अशोक बडे व दत्ता पाटील सप्रे यांनीही अर्ज न भरल्याने त्यांनी निवडणुकीपासून माघार घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष केतन क्षीरसागर यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी बंडखोरी करत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. त्यांनी मशाल चिन्हावर उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. प्रभाग सातमधून भाजपचे माजी नगरसेवक रवींद्र बारस्कर इच्छुक होते. मात्र, ऐनवेळी भाजपाने त्यांना उमेदवारी नाकारली. त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. स्वीकृत नगरसेवक रामदास आंधळे यांनाही प्रभाग तीनमधून उमेदवारी नाकारण्यात आल्याची माहिती आहे. भाजपचे सावेडी मंडलअध्यक्ष सीए ज्ञानेश्वर काळे यांना भाजपने तिकीट नाकारल्याने त्यांनी शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र त्यांना एबी फॉर्म मिळाला नसल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, महाविकास आघाडीतून महाराष्ट्र नवनिर्माण सेना बाहेर पडली असून त्यांनी स्वबळावर आठ जागा लढविण्याचा निर्णय घेतला आहे.
एबी फॉर्मसाठी गर्दी, जागेवरच पक्षप्रवेश
महापालिका निवडणुकीसाठी सावेडी तहसील कार्यालयात व अन्य निवडणूक निर्णय अधिकार्यांच्या कार्यालयांबाहेर मोठी गर्दी झाली होती. भाजप व राष्ट्रवादीचे पदाधिकारी एबी फॉर्म घेऊन उपस्थित होते. अनेक उमेदवारांनी आधी अर्ज भरले, त्यानंतर एबी फॉर्म जोडले. काही इच्छुकांनी कार्यालयासमोरच एबी फॉर्म स्वीकारत जाहीर पक्षप्रवेश केला आणि घोषणाबाजी केली.
कोतकर गटाचे राजकीय विसर्जन
ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर यांच्या एंट्रीमुळे महापालिका निवडणुकीत सुरूवातीला रंगत आली होती. ते भाजपच्या व्यासपीठावर दिसल्यानंतर त्यांचे समर्थक भाजपकडून उमेदवारी करतील, असा अंदाज होता. त्यानंतर शिवसेनेशी त्यांची जवळीक असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. मात्र, अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी कोतकर समर्थकांनी अपक्ष अर्ज दाखल केल्याने महापालिका निवडणुकीत कोतकर गट विसर्जित झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
महाविकास आघाडी एकत्रित मैदानात
महाविकास आघाडी 17 प्रभागांत एकत्रितपणे निवडणूक लढवणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) व शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे गट) या घटक पक्षांनी आपापल्या उमेदवारांना अधिकृत एबी फॉर्म देऊन उमेदवारी जाहीर केली. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने 32 जागांवर, शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने 24 जागांवर, तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने 14 जागांवर उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले आहेत. ही माहिती महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर व शिवसेनाचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी दिली.
बंडखोरांवर पक्षशिस्त भंगाची कारवाई करणार – मोहिते
महापालिका निवडणुकीसाठी भाजपने जुन्या-नव्यांचा समन्वय साधत, प्रदेशस्तरावरील सर्व्हेक्षणाच्या आधारे निष्ठावंत उमेदवारांना संधी दिली आहे. त्यामुळे निष्ठावंतांवर अन्याय झाल्याचा आरोप चुकीचा असून पक्षाच्या विरोधात बंडखोरी करणार्यांची प्रथम समजूत काढली जाईल. तरीही त्यांनी ऐकले नाही, तर पक्षशिस्त भंगाची कारवाई केली जाईल, असा इशारा भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिला. महापालिका निवडणुकीसाठी भाजप-राष्ट्रवादी (अजित पवार गट) युती झाली असून 68 जागांपैकी भाजप 32 तर राष्ट्रवादी 34 जागा लढवणार आहे. मुकुंदनगर येथील जागांवर सक्षम उमेदवार न मिळाल्याने दोन्ही पक्षांनी उमेदवार दिलेले नाहीत, असे मोहिते यांनी स्पष्ट केले. महायुती करण्याचा प्रयत्न झाला होता; मात्र शिवसेना शिंदे गटाच्या अवास्तव जागा मागणीमुळे युती शक्य झाली नाही. शिवसेनेला 19 जागा देण्याचा प्रस्ताव होता; मात्र त्यांना महायुती मान्य नसल्याने त्यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला, असेही मोहिते यांनी सांगितले.




