अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
महापालिका निवडणुकांसाठी शनिवारी चिन्ह वाटप झाल्यानंतर आता खर्याअर्थाने प्रचाराचा रणधुमाळी सुरू झाली आहे. उमेदवारांकडून थेट गाठीभेटीसह मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रचार माध्यमाचा उपयोग करण्यात येत आहे. मात्र, यंदा बदलेल्या प्रभाग रचनेमुळे चार उमेदवारांचे पॅनल असणार आहे. अशावेळी चार उमेदवारांसाठी स्वतंत्र मतदान करावे लागणार आहे. महत्त्वाचे म्हणजे हे मतदान कसे करावे असा प्रश्नही अनेकांना पडला आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाने मार्गदर्शन करणारा एक व्हिडिओ देखील प्रसारित केला आहे.
चार जागांसाठी मतदान यंत्रावर मतदान कसे करायचे, याची उत्सुकता उमेदवार, कार्यकर्ते, नागरिकांना लागून राहिली आहे. मतदान यंत्रावर प्रत्येक प्रभागातील अ, ब, क, ड अशा गटामधील उमेदवारांची माहिती अनुक्रमे विविध रंगांमध्ये दिली आहे. त्यामुळे उमेदवारांच्या संख्येनुसार त्या त्या प्रभागातील यंत्रांची संख्या निश्चित केली जाणार आहे. चार सदस्यीय प्रभाग रचनेनुसार प्रथमच महापालिकेची निवडणूक होत आहे. त्यातील मतदान करण्याच्या प्रक्रियेबाबत उमेदवार, कार्यकर्ते, नागरिकही अजून अनभिज्ञ आहेत. निवडणूक आयोगाच्या या व्हिडीओत प्रभाग रचनेत मतदान कसं करावं? हे समजून सांगण्यात आलं आहे.
आयोगाने प्रसारित केलेल्या या व्हिडिओनुसार तुम्हाला चार उमेदवारांसाठी स्वतंत्र मतदान करावं लागणार आहे. याची नेमकी प्रक्रिया कशी असणार आहे? स्टेप बाय स्टेप समजून घेऊया. कशी असेल मतदानाची प्रक्रिया? यावेळी मतदान केंद्रावर कमीत कमी दोन व जास्तीत जास्त चार ईव्हीएम म्हणजेच इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन असतील. तुम्हाला मतदान एकूण चार म्हणजेच जागा अ, ब, क, ड अशा चार जागांसाठी मतदान करणं आवश्यक आहे. उमेदवारांच्या संख्येनुसार या चारही जागांची आखणी ईव्हीएम मशीनवर करण्यात येणार आहे. यासाठी एकतर चार स्वतंत्र ईव्हीएम असतील, किंवा दोन मशीनवर या जागा विभागण्यात येईल.
चारही जागेसाठी मतपत्रिकांचे रंग वेगवेगळे दिलेले जाणार आहे. अ जागेसाठी पांढरा रंग ब जागेसाठी गुलाबी रंग, क जागेसाठी पिवळा रंग व ड जागेसाठी निळा रंग असणार आहे. प्रत्येक मशीनवर उमेदवाराचे नाव व त्याचे निवडणूक चिन्ह असेल. त्यासमोरील बटन दाबताच लाल रंगाचा लाईट लागेल. याचा अर्थ त्या जागेसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ही प्रक्रिया ब, क आणि ड जागेसाठीही असेल. जर तुम्हाला चारपैकी कोणत्याही उमेदवाराला मत द्यायचं नसेल तर तर तुमच्यासाठी नोटाचा पर्याय देखील देण्यात येणार आहे. शेवटचं म्हणजे, ड जागेसाठी मतदान केल्यावर बजर वाजेल. याचा अर्थ तुम्ही चारही जागांसाठीची मतदान प्रक्रिया पूर्ण केली आहे.




