अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत पहिल्याच दणक्यात राष्ट्रवादी-भाजपच्या पाच जागा बिनविरोध झाल्या आहेत. दरम्यान, शनिवारी चिन्ह वाटपच्या दिवशी राष्ट्रीय, राज्यस्तरीय, नोंदणीकृत पक्षाच्या उमेदवारांना आडनावाच्या क्रमावारीनुसार अनुक्रमांक देण्यात आले तर, प्रभागनिहाय एकत्रित अपक्षांना चिन्हाचे वाटप करण्यात आले. आता आजपासून खुल्या प्रचारास प्रारंभ होणार आहे.
नगर महापालिकेतील कार्यकारी मंडळाच्या पाच वर्षाचा काळ संपल्यानंतर तब्बल दोन वर्षांनंतर होत आहे. त्यामुळे शहरात सर्वत्र राजकीय महोल तयार झाला आहे. महापालिकेच्या 68 जागांसाठी निवडणूक होत आहे. मात्र, त्यातील पाच जागा मतदानाअगोदरच बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे आता 63 जागांसाठी 283 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. निवडणुकीच्या रिंगणात राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, आम आदमी पार्टी, एमआयएम, सामजवादी पार्टी, वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पार्टी, एकलव्य आदिवासी बहुजन पार्टीसह अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आज निवडणूक निर्णय अधिकार्यासमोर राष्ट्रीय, राज्यस्तरीय व नोंदणीकृत पक्षांच्या उमेदवारांना क्रमवार अनुक्रमांक देण्यात आले.
त्यानंतर प्रत्येक प्रभागातील अपक्ष उमेदवारांना चिन्हाचे वाटप करण्यात आले. प्रभागात अ, ब, क, डमधील सर्व अपक्षांचे अर्ज एकत्रित करून पहिल्या, दुसर्या आणि तिसर्या पसंतीची चिन्हे चिठ्ठी काढून वाटप करण्यात आले. तर, अन्य अपक्षांना निवडणूक निर्णय अधिकार्यांनी चिन्हाचे वाटप केले. रिंगणातील उमेदवार आजपासून खुल्या प्रचास सुरूवात करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप अशी युती आहे. तर, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अशी महाविकास आघाडी मैदानात आहेत.
शिवसेना शिंदे गटाने स्वतंत्र शड्डू ठोकल्याने निवडणुकीत रंगत आली आहे. आता महायुती, आघाडी, शिवसेनेच्या उमेदवारांना अपक्ष उमेदवारांनीही आवाहन उभे केले आहे. महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी महापालिकेत आचारसंहिता व परवानगी कक्ष स्थापन करण्यात आला आहे. परवानगी कक्षातून उमेदवारांना प्रचार सभा, चौक सभा, बॅनर, रॅलीसाठी परवानगी देण्यासाठी कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
अपक्षांची कपबशी, नारळ, कपाटला पसंती
महापालिकेच्या निवडणुकीत तब्बल अपक्ष उमेदवार मैदानात उतरले आहेत. प्रचारासाठी अपक्षांनी कंबर कसली आहे. आज निवडणूक निर्णय अधिकार्यांनी अपक्ष उमेदवारांना चिन्हाचे वाटप केले. त्यात मेणबत्ती, बॅट, कपबशी, कपाट, शिट्टी, नारळ, बासुरी, सूर्यफूल, फुलकोबी, छत्री, हिरा, एअर कंडिशनर, लॅपटॉप, ऑटोरिक्षा, डायमंड, फुगा, रिक्षा, सरफचंद, थापी, बॅटरी, फळा, रोड रोलर, गॅस सिलेंडर, थापी असे चिन्हे देण्यात आले आहेत. उमेदवारांनी सर्वाधिक कपबशी, कपाट, ऑटोरिक्षा, नारळ अशा पारंपरिक चिन्हाची मागणी केली होती.




