अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
अहिल्यानगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक मध्ये प्रभाग क्रमांक 1 ते 17 मधून निवडणूक लढविणार्या सर्व उमेदवारांनी (बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांसह) निवडणूक खर्चाचा हिशोब विहित नमुन्यात व ठरविलेल्या कालावधीत सादर करणे बंधनकारक असल्याचे आदेश महानगरपालिका निवडणूक खर्च हिशोब तपासणी प्रमुख कार्यालयामार्फत देण्यात आले आहेत.
राज्य निवडणूक आयोगाच्या 7 फेब्रुवारी 1995 च्या आदेशानुसार, निवडणूक निकाल जाहीर झाल्याच्या दिनांकापासून 30 दिवसांच्या आत उमेदवारांनी निवडणुकीसाठी प्राप्त निधीचा तपशील नमुना क्रमांक एक, निवडणूक दैनंदिन व एकूण खर्चाचा तपशील नमुना क्रमांक दोन, तसेच सक्षम प्राधिकार्यांसमोर साध्या कागदावर शपथपत्र नमुना क्रमांक तीन या विहित नमुन्यात आवश्यक मूळ कागदपत्रांसह सादर करणे आवश्यक आहे. सदर खर्चाचा हिशोब उमेदवारांनी स्वतःच्या स्वाक्षरीसह प्रत्यक्ष निवडणूक खर्च कक्ष, महानगरपालिका मुख्य कार्यालय, अहिल्यानगर येथे कार्यालयीन वेळेत सादर करावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
प्रभागनिहाय खर्च तपासणीचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे : बुधवार, 21 जानेवारी- प्रभाग क्रमांक 01, 02, 07, 08, 13, 14, गुरूवार, 22 जानेवारी- प्रभाग क्रमांक 03, 04, 09, 10, 15, 16, शुक्रवार, 23 जानेवारी- प्रभाग क्रमांक 05, 06, 11, 12, 17.
दरम्यान, निवडणूक लढविणार्या उमेदवाराने निवडणूक खर्चाचा हिशोब आयोगाने निश्चित केलेल्या कालावधीत सादर न केल्यास संबंधित उमेदवारास महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 10 अन्वये अपात्र ठरविण्याची तरतूद असून, विहित पध्दतीने खर्च सादर करण्यात कसूर केल्यास महानगरपालिका अधिनियम 1988 च्या कलम 16 (1) (ई) अंतर्गत कारवाई होऊ शकते, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. हा आदेश निवडणूक खर्च हिशोब तपासणी प्रमुख जनार्दन सहारे यांनी जारी केला असून, सर्व उमेदवारांनी याची नोंद घ्यावी व विहित तारखांना खर्च तपासणीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.




