Wednesday, April 29, 2026
HomeनगरAMC Election : 1 हजार 800 अधिकारी- कर्मचार्‍यांना प्रशिक्षण

AMC Election : 1 हजार 800 अधिकारी- कर्मचार्‍यांना प्रशिक्षण

वरिष्ठ अधिकार्‍यांकडून मार्गदर्शन

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

मनपा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी मतदान अधिकारी व कर्मचार्‍यांसाठी पहिल्या विशेष प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. हा प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. निवडणूक प्रक्रिया निर्भय, पारदर्शक व विश्वासार्ह पध्दतीने पार पाडण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबींवर या प्रशिक्षणात सविस्तर आणि सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

- Advertisement -

महानगरपालिकेच्या दोन हजार मतदान अधिकारी व कर्मचार्‍यांपैकी एक हजार 800 अधिकारी व कर्मचारी या प्रशिक्षणास उपस्थित होते. शहरातील 17 प्रभागांमधील 345 मतदान केंद्रांवरील (बूथ) व्यवस्थापन, मतदान प्रक्रिया, मतदारांशी वागणूक, कायदेशीर नियमावली तसेच निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. प्रशिक्षणादरम्यान मतदान प्रक्रियेतील प्रत्येक टप्पा स्पष्ट करताना मतदानाच्या दिवशी उद्भवू शकणार्‍या अडचणी, त्यावरील उपाययोजना, जबाबदार्‍या व शिस्तपालन यावर भर देण्यात आला. तसेच मतदान प्रक्रियेची अचूकता व पारदर्शकता राखण्यासाठी ईव्हीएम मशीनच्या वापराबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.

ईव्हीएमची तयारी, मतदान सुरू करण्यापासून ते मतदान समाप्तीनंतरची प्रक्रिया याबाबत अधिकार्‍यांना सखोल मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे, अतिरिक्त आयुक्त डॉ. विजयकुमार मुंडे तसेच नगरसचिव मेहेर लहारे आदी उपस्थित होते. मतदान प्रक्रियेत कोणतीही त्रुटी राहू नये, मतदारांचा विश्वास कायम राहावा आणि निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी, या उद्देशाने हे प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त ठरल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

दोनशे कर्मचारी गैरहजर
मतदान प्रक्रियेसाठी केंद्राध्यक्ष, सहाय्यक केंद्राध्यक्ष व इतर कर्मचारी अशा सुमारे दोन हजारांवर कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशिक्षणासाठी सुमारे एक हजार 800 कर्मचारी उपस्थित होते. गैरहजर कर्मचार्‍यांवर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पुढील कार्यवाही केली जाईल, असे सांगण्यात आले. दरम्यान, महानगरपालिकेला मतदान प्रक्रियेसाठी 800 कंट्रोल युनिट, एक हजार 600 बॅलेट युनिट (ईव्हीएम) उपलब्ध झाले आहेत. मेमरी कार्ड, पॉवर बँकही पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. या मतदान यंत्रांची पहिल्या टप्प्याची तपासणी केली जात आहे.

ताज्या बातम्या

पडसाद : आणखी एका कांदा समितीचा घाट

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत' - संपादक कांद्याच्या समस्येवर विचार करण्यासाठी राज्य सरकारने नुकतीच सचिव स्तरावर एका समितीची घोषणा करुन तसे राजपत्र प्रसिद्ध...