Saturday, September 5, 2026
HomeनगरAhilyanagar : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोंबीग ऑपरेशन

Ahilyanagar : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोंबीग ऑपरेशन

18 आरोपी अटकेत, हद्दपार इसम ताब्यात || गावठी दारू नष्ट

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

- Advertisement -

महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी कारवाई सुरू केली असून, त्याच अनुषंगाने मंगळवारी (6 जानेवारी) पहाटे शहर उपविभागात विशेष कोंबीग ऑपरेशन राबविण्यात आले. या कारवाईत एकूण 18 संशयित आरोपींना अटक, तर 30 पकड वारंटांची बजावणी करण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे यांच्या नेतृत्वाखाली हे ऑपरेशन राबविण्यात आले. कोतवाली, तोफखाना व भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत सकाळी 5 ते 9 या वेळेत ही संयुक्त कारवाई करण्यात आली. या कोंबीग ऑपरेशनदरम्यान हद्दपार इसम शोएब रौफ कुरेशी (रा. झेंडीगेट, अहिल्यानगर) यास ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय योगेश दुर्गेश साठे (रा. यशवंत नगर, डेरी फॉर्म रोड, भिंगार) हा तलवार बाळगताना आढळून आल्याने त्याच्यावर शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दारूबंदी कायद्यांतर्गतही कारवाई करण्यात आली असून, महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 च्या कलम 65(ई) अंतर्गत एकूण 4 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये अंदाजे 37 हजाार 500 रूपये किंमतीची गावठी हातभट्टीची तयार दारू नष्ट करण्यात आली.

कोंबीग ऑपरेशनदरम्यान कोतवाली, तोफखाना व भिंगार कॅम्प परिसरात 14 पाहिजे व फरारी आरोपींची तपासणी करण्यात आली. एन.बी.डब्ल्यू. (नॉन बेलेबल वॉरंट) अंतर्गत 18 संशयित आरोपींना अटक, तर जामीनपात्र वारंटातील 24 बॉरंटांची बजावणी करण्यात आली असून, त्याबाबतचा अहवाल संबंधित न्यायालयात सादर करण्यात येणार आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता राखण्यासाठी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा घालण्यासाठी अशा प्रकारची नियमित कोंबीग ऑपरेशन्स पुढेही राबविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : आयुष हॉस्पिटलमध्ये तोडफोड; दोन नातेवाइकांसह ५ जणांवर...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik पंचवटी परिसरातील (Panchvati Area) निमाणी बस स्टँडसमोरील आयुष हॉस्पिटलमध्ये (Aayush Hospital) महिला रुग्णाच्या मृत्यूनंतर संतप्त नातेवाइकांनी गोंधळ घालत डॉक्टरांना मारहाण...