Friday, January 23, 2026
HomeनगरAMC Election : बंडखोरी टाळण्यासाठी 30 तारखेपर्यंत ‘घोळात घोळ’

AMC Election : बंडखोरी टाळण्यासाठी 30 तारखेपर्यंत ‘घोळात घोळ’

सगळेच दे धक्क्याच्या तयारीत? महायुती, महाविकास आघाडीकडून पत्ते ओपन होईना

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आता अवघे दोन दिवस उरले आहेत. असे असतांना अद्यापही महायुती व महाविकास आघाडी उमेदवारांची यादी जाहीर करण्यास टाळाटाळ सुरू असल्याची चर्चा आहे. दोन दिवसांपासून घडणार्‍या घडामोडी आणि कानावर येणार्‍या वृत्तामुळे महायुती करण्याचे ठरले असल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात अजूनही बैठकांच्या फैरी सुरू असून अद्याप अंतिम निर्णय झाला नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, महापालिकेच्या सत्तेसाठी महायुतीची कधी लोणीला, तर कधी नगरला, तर कधी मुंबईत निर्णायक बैठक होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे महायुतीच्या उमेदवारांची यादी जाहीर झाल्यावर आमचे उमेदवार जाहीर करू असे महाविकास आघाडीच्या सुत्रांकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

मनपा निवडणुकीत महायुतीमध्ये सात जागांचा वाद असून राष्ट्रवादी अजित पवार गट व भाजपकडून काही मोक्याच्या जागा शिवसेना शिंदे गटाला सोडण्यास तयार नाही. या जागांबाबत आज सोमवारी तोडगा निघणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, महायुतीच्या यादीच्या प्रतीक्षेत असलेल्या महाविकास आघाडीने सावध भूमिका घेतली आहे. त्यामुळे अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 30 डिसेंबर रोजी महायुती व महाविकास आघाडी धक्का देण्याच्या तयारीत आहे. महाविकास आघाडीची यादी प्रथम जाहीर होईल अशी अपेक्षा होती. मात्र तेही महायुतीच्या यादीची प्रतीक्षा करीत आहे. महायुतीमध्ये बंडखोरी मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. त्या नाराज व बंंडखोरांना उमेदवारी देऊन आयते उमेदवार मिळण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे. त्यामुळे तेही यादी जाहीर करीत नसल्याचे सांगण्यात आले आहे. अर्थात त्यांच्या संपर्कात अनेक महायुतीचे इच्छूक असल्याचे सांगण्यात आले आहे.

YouTube video player

आजचा सोमवार व उद्याचा मंगळवार वेगाने राजकीय हालचाली होण्याची शक्यता आहे. महायुतीमध्ये संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी जागाचा घोळ न मिटल्याचे सांगून शेवटच्या दिवशी निश्चित उमेदवारांना एबीफॉर्म देऊन अन्य इच्छूकांना बेसावध ठेवण्याचा महायुतीच्या नेत्यांचा प्रयत्न आहे. महायुतीमध्ये गेल्या आठ दिवसांपासून बैठकांवर बैठका सुरू आहे. राष्ट्रवादी व भाजप यांच्या जागा वाटपाचा तिढा नसला तरी शिवसेना शिंदे गटाला देण्यात येणार्‍या काही जागांवरून वाद आहे. त्यात प्रभाग क्रमांक 15, 13, 9 या प्रभागातील जागा शिंदे गटाला देण्यास विरोध आहे.

गेल्या दोन दिवसांपासून या जागांवर चर्चा झाली असून आता या तीन प्रभागातील 12 जागांपैकी 7 जागांचा तिढा सुटलेला नाही. आता यावर चर्चा सुरू आहे. शनिवारी रात्री उशीरापर्यंत यावर चर्चा झाली. त्यानंतर रविवारी दुपारी देखील चर्चा झाली. पण अद्यापही त्यावर तोडगा निघालेला नाही. त्यामुळे पुढील दोन दिवस मोठ्या प्रमाणावर राजकीय घडामोडी होण्याची शक्यता आहे. महायुती व महाविकास आघाडी शेवटच्या दिवसापर्यंत उमेदवारी यादी जाहीर करण्याचा सस्पेस कायम ठरण्याच्या प्रयत्नात आहे. परिणाम बंडखोरी करणार्‍यांना बेसावध ठरण्यात येत आहे.

कोतकर गटाच्या भूमिकेकडे लक्ष
केडगावमधील कोतकर गटाने प्रभाग 16 व 17 मध्ये प्रचाराला सुरूवात केली आहे. आठ उमेदवार व भानुदास कोतकर हे घरोघरी प्रचार करीत आहे. अर्थात कोतकर यांचा करिष्मा आता चालणार का हा प्रश्न असला तरी यंत्रणा कामाला लागली आहे. हा गट शिवसेना शिंदे गटाच्या संपर्कात असला तरी भाजपशी देखील त्यांनी संपर्क तोडलेला नाही. दोन्ही पक्षांबरोबर चर्चा सुरू आहे. त्यामुळे गेल्या निवडणुकीप्रमाणे यंदा देखील ते धक्कातंत्राचा वापर करणार का की स्वतंत्र निवडणूक लढणार याकडे नगरकरांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

एकनाथ

KDMC मध्ये मनसेच्या पाठिंब्याबाबत एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, मनसेने विकासाच्या...

0
मुंबई | Mumbaiशिवसेनापक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज (शुक्रवार, 23 जानेवारी) 100 वी जयंती आहे. या निमित्ताने राज्यभरात शिवसैनिकांनी विविध कार्यक्रमांचे आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन...