Saturday, January 24, 2026
HomeनगरAMC Election : महापालिका निवडणुकीची रणधुमाळी, अर्ज भरण्यास प्रारंभ

AMC Election : महापालिका निवडणुकीची रणधुमाळी, अर्ज भरण्यास प्रारंभ

कागदपत्रांच्या जुळवाजुळवीसाठी उमेदवारांची धावपळ || प्रशासनाकडून जय्यत तयारी

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

अहिल्यानगर महापालिकेची तब्बल दोन वर्षांनंतर सार्वत्रिक निवडणूक होत असून, राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार आज मंगळवार (23 डिसेंबर) पासून इच्छुक उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात होणार आहे. अर्ज भरण्याची अंतिम मुदत 30 डिसेंबर असून, या कालावधीत इच्छुक उमेदवारांची अर्ज भरण्यासाठी गर्दी पाहावयास मिळणार आहे. सहा ठिकाणी अर्ज भरण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

- Advertisement -

महापालिकेच्या कार्यकारी मंडळाची मुदत डिसेंबर 2023 मध्ये संपुष्टात आली होती. त्यानंतर महापालिकेत प्रशासकराज सुरू झाले. डिसेंबर 2023 ते डिसेंबर 2025 या कालावधीत महापालिकेत प्रशासक शासन कार्यरत होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार अहिल्यानगर महापालिकेच्या 17 प्रभागांतील 68 जागांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार असून, 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार आहे.

YouTube video player

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 23 ते 30 डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस, एमआयएम आदी पक्षांच्या इच्छुक उमेदवारांची गेल्या काही दिवसांपासून महापालिकेत मोठी धावपळ सुरू आहे. उमेदवारी अर्जासोबत आवश्यक असलेले ना हरकत प्रमाणपत्र मिळविण्यासाठी इच्छुकांना बांधकाम, पाणीपुरवठा, घरपट्टी, नगररचना, आरोग्य, अग्निशमन आदी विविध विभागांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.

सात ठिकाणी चेक पोस्ट
आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शहरातील सात प्रमुख ठिकाणी चेक पोस्ट उभारण्यात येणार आहेत. स्टेट बँक चौक, सोलापूर रस्ता, अरणगाव, केडगाव, कल्याण रस्ता, मनमाड रस्ता तसेच छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर हे चेक पोस्ट कार्यरत राहणार आहेत. या अनुषंगाने सात एसएसटी (स्थिर निगराणी पथक) पथकांची स्थापना करण्यात आली आहे. याशिवाय अवैध रोकड व दारूच्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी दोन एफएसटी (फिरती निगराणी पथक) पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या एकूण नऊ पथकांमध्ये पोलीस विभाग व महानगरपालिका प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी सहभागी असणार आहेत.

अर्ज भरण्यासाठी सहा ठिकाणी व्यवस्था
अर्ज दाखल करण्यासाठी सहा ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. सहा निवडणूक निर्णय अधिकारी व त्यांना मदतीसाठी सहा सहायक निवडणूक निर्णय अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आली. अर्ज दाखल करण्याचे ठिकाणे व कंसात प्रभाग पुढीलप्रमाणे : तहसील कार्यालय, मध्यवर्ती इमारत, सावेडी (1, 2, 3), प्रभाग कार्यालय प्रभाग समिती क्रमांक 1, आकाशवाणी शेजारी, सावेडी (4, 5, 6), भूसंपादन कार्यालय, टीव्ही सेंटर (7, 8), जुने मनपा कार्यालय मधील आयुक्त यांचे दालन (9, 10, 11), प्रभाग समिती क्रमांक 4, बुरूडगाव (12, 13, 14) व केडगाव उप कार्यालय, केडगाव (15, 16, 17).

मतदान केंद्रांची यादी जाहीर
महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रभागनिहाय व बुथनिहाय मतदान केंद्रांची यादी जाहीर करण्यात आली आहे. प्रभाग तीनमध्ये सर्वात कमी 16 मतदान केंद्रे, तर प्रभाग दहामध्ये सर्वाधिक 26 मतदान केंद्रे आहेत. प्रभागनिहाय मतदान केंद्रांची संख्या : प्रभाग 1 (25), प्रभाग 2 (24), प्रभाग 3 (16), प्रभाग 4 (22), प्रभाग 5 (17), प्रभाग 6 (19), प्रभाग 7 (18), प्रभाग 8 (20), प्रभाग 9 (19), प्रभाग 10 (26), प्रभाग 11 (23), प्रभाग 12 (22), प्रभाग 13 (18), प्रभाग 14 (19), प्रभाग 15 (19), प्रभाग 16 (21), प्रभाग 17 (17).

‘एक खिडकी’तून परवानग्या
महापालिकेत आचारसंहिता कक्षासह एक खिडकी कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षामधून इच्छुक उमेदवारांना सभा, रॅली, चौकसभा, स्नेहभोजन, प्रचार रिक्षा आदी निवडणूक प्रचारासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या मिळणार आहेत. इच्छुकांनी रीतसर अर्ज सादर केल्यानंतर पोलिसांकडून आवश्यक अहवाल मागवून परवानगी दिली जाणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पोलिसांकडून मोहिम
गंभीर गुन्ह्यांतील पाहिजे व पसार असलेल्या संशयित आरोपींचा शोध शहर पोलिसांकडून घेण्यात येत आहे. सराईत गुन्हेगारांना नोटीसा बजावण्यात येत असून काही संशयितांवर हद्दपार, मोक्का व एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच अवैध धंद्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले असून अवैध शस्त्रांविरोधात विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. आवश्यक त्या परवानाधारक शस्त्रांचे संकलनही करण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

Sangamner : अवैध कत्तलखान्यावर ‘एलसीबी’चा पुन्हा सर्जिकल स्ट्राईक

0
संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner शहरातील अवैध कत्तलखान्यावर (Illegal Slaughterhouses) अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (LCB) शुक्रवारी (दि.23) महिन्याभरात चौथी मोठी कारवाई केली आहे. गोवंश जनावारांचे कत्तल...