Tuesday, January 13, 2026
HomeनगरAMC Election : मतदान व मतमोजणीसाठी दोन हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात

AMC Election : मतदान व मतमोजणीसाठी दोन हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात

दोन दिवस अहिल्यानगर शहरात कडक बंदोबस्त

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

अहिल्यानगर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या गुरूवारी (15 जानेवारी) मतदान प्रक्रिया पार पडणार असून, शुक्रवारी (16 जानेवारी) मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शहर पोलिसांकडून दोन दिवसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मतदान व मतमोजणी शांततेत पार पाडण्यासाठी सुमारे दोन हजारांहून अधिक पोलीस अधिकारी, अंमलदार व होमगार्ड रस्त्यावर असणार आहेत. महापालिका निवडणुकीसाठी आज मंगळवार (13 जानेवारी) हा जाहीर प्रचाराचा शेवटचा दिवस आहे.

- Advertisement -

सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत प्रचाराची मुदत असून, त्यानंतर उद्या (बुधवारी) छुप्या प्रचार केला जाणार आहे. मतदानाच्या पूर्वसंध्येला मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवार व त्यांच्या समर्थकांकडून विविध क्लृप्त्या वापरल्या जाण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी खबरदारीचे उपाय योजले आहेत. निवडणूक प्रचारादरम्यान शहरातील काही भागांत धमकावणे, शिवीगाळ व मारहाणीच्या घटना घडल्या आहेत. या घटनांचा उद्रेक मतदान किंवा मतमोजणीच्या दिवशी होऊ नये, यासाठी पोलिसांनी दिवसा व रात्रीची गस्त वाढवली आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील संवेदनशील भागांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.

YouTube video player

शहरातील 17 प्रभागांमध्ये एकूण 345 मतदान केंद्रांवर मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडावी यासाठी आवश्यक मनुष्यबळ, साहित्य आणि सुरक्षा व्यवस्था पूर्णतः सज्ज ठेवण्यात आली आहे. नागरिकांना भयमुक्त वातावरणात मतदान करता यावे, यासाठी पोलीस प्रशासन विशेष दक्षता घेत आहे. दरम्यान, मतमोजणी शुक्रवारी सकाळी 9.30 वाजता एमआयडीसीतील वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये सुरू होणार आहे. त्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठीही मतदानाच्या दिवशी असलेलाच बंदोबस्त कायम ठेवण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

मतदानासाठी एकूण 1 हजार 800 कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून, मतदान केंद्रांवर पाणी, वीज, बैठक व्यवस्था यासह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. लोकशाहीचा हा उत्सव यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी निर्भयपणे आणि उत्स्फूर्तपणे मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

आज प्रचार तोफा थंडावणार
महापालिका निवडणुकीसाठी आज मंगळवार (13 जानेवारी) जाहीर प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत प्रचाराची मुदत असून, सर्वच पक्ष व उमेदवारांकडून आज जोरदार शक्तीप्रदर्शन होण्याची शक्यता आहे. प्रत्येक प्रभागात रॅली, चौक सभा घेऊन प्रचाराची सांगता केली जाणार आहे. त्यानंतर बुधवारी छुप्या पध्दतीने प्रचार करण्यात येणार असून, मतदानाची रणनीती आखली जाणार आहे.

असा राहणार बंदोबस्त
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक 1, पोलीस उपअधीक्षक 4, प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक 1, पोलीस निरीक्षक 6, सहायक पोलीस निरीक्षक/उपनिरीक्षक 118, प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक 15, पोलीस अंमलदार 1,066, एसआरपीएफ कंपनी 1, दंगा नियंत्रण पथक (आरसीपी) 2, स्ट्रायकिंग फोर्स पथक 5, होमगार्ड 650.

चार दिवस ‘ड्राय डे’
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने चार दिवस मद्यविक्री बंद (ड्राय डे) ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अहिल्यानगर महापालिका हद्दीत 13 जानेवारी सायंकाळी 6 वाजल्यापासून ते 16 जानेवारी रोजी मतमोजणी पूर्ण होईपर्यंत दारूची दुकाने, बार व परमिट रूम बंद राहणार आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : महापालिका निवडणुकीत दबाव व धमकीचा आरोप

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वार्ड क्रमांक 1 मधील निवडणूक अधिक तापत चालली असून, उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दबाव, धमकी व आर्थिक आमिष...