Saturday, January 24, 2026
HomeनगरAMC Election : चार मतांची अडचण! मतदानात मतदारांचा गोंधळ

AMC Election : चार मतांची अडचण! मतदानात मतदारांचा गोंधळ

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

अहिल्यानगर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरूवारी (15 जानेवारी) पार पडलेल्या मतदान प्रक्रियेत मतदारांचा उत्साह दिसून आला असला, तरी प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी प्रशासनाच्या अपुर्‍या नियोजनामुळे अनेक ठिकाणी गोंधळ, संभ्रम आणि तणावाचे चित्र निर्माण झाले. प्रत्येक प्रभागातून चार नगरसेवक निवडायचे असल्याने प्रत्येक मतदाराला चार मते देण्याचा अधिकार होता. मात्र हीच प्रक्रिया अनेक मतदारांसाठी डोकेदुखी ठरल्याचे मतदान केंद्रांवर दिसून आले. यामुळे अनेक मते बाद होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

- Advertisement -

गुरूवारी सकाळी साडेसात पासून मतदानाला सुरूवात झाली. मतदान केंद्रावर येताना मतदान क्रमांक, मतदानाची योग्य पध्दत आणि संबंधित केंद्र शोधताना अनेक मतदार गोंधळलेले दिसले. काही ठिकाणी कुटुंबातील सदस्य, उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींमार्फत मतदारांना मार्गदर्शन केले जात होते. विशेषतः एकाच शाळेत अनेक मतदान केंद्र असल्याने आपले मतदान नेमके कुठे आहे? हा प्रश्न बंदोबस्तावरील कर्मचारी आणि उपस्थितांपुढे वारंवार विचारला जात होता. महापालिका प्रशासनाने प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांना मतदान क्रमांक सांगण्यासाठी बीएलओ (बूथ लेव्हल ऑफिसर) नेमले होते. मात्र प्रत्यक्षात बीएलओ उपस्थित असूनही अनेक मतदार त्यांच्यापर्यंत पोहोचत नसल्याने तेही संभ्रमात पडलेले दिसले.

YouTube video player

याच संधीचा फायदा घेत काही राजकीय पक्षांचे उमेदवार व कार्यकर्ते मतदारांना मतदान क्रमांक असलेल्या चिठ्ठ्या देताना आढळले. या चिठ्ठ्यांवर पक्षाचे चिन्ह व उमेदवारांचे नाव असल्याने त्या मतदान केंद्रात नेण्यास प्रशासनाने विरोध केला. यामुळे काही ठिकाणी वादाचे प्रसंगही उद्भवले. प्रत्येक मतदान केंद्राच्या 200 मीटर परिसरात राजकीय पक्ष व अपक्ष उमेदवारांचे बूथ लागले होते. तेथून मतदारांना मतदान क्रमांकाच्या चिठ्ठ्या दिल्या जात होत्या. मात्र काही मतदान केंद्रांवर कोणतेही अधिकृत मार्गदर्शन नसल्याने मतदारांना इतर मतदारांवरच अवलंबून राहावे लागले.

मतदान केंद्राच्या आत उमेदवारांना थांबण्यास मनाई होती, तर केवळ अधिकृत प्रतिनिधींनाच थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. एकंदरीत, निवडणुकीसारख्या महत्त्वाच्या प्रक्रियेसाठी प्रशासनाने केलेल्या तयारीतील त्रुटी मतदानाच्या दिवशी स्पष्टपणे समोर आल्या. काही मतदान केंद्रांबाहेर गर्दी, गोंधळाचे वातावरण तर काही ठिकाणी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. ‘लोकशाहीचा उत्सव’ म्हणवणार्‍या या प्रक्रियेत मतदारांना सहज, सुलभ आणि निर्भय मतदान करता यावे, यासाठी भविष्यात अधिक नियोजनबध्द आणि पारदर्शक व्यवस्थेची गरज असल्याचे चित्र या निवडणुकीतून ठळकपणे समोर आले.

ताज्या बातम्या

Sangamner : अवैध कत्तलखान्यावर ‘एलसीबी’चा पुन्हा सर्जिकल स्ट्राईक

0
संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner शहरातील अवैध कत्तलखान्यावर (Illegal Slaughterhouses) अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (LCB) शुक्रवारी (दि.23) महिन्याभरात चौथी मोठी कारवाई केली आहे. गोवंश जनावारांचे कत्तल...