Monday, July 27, 2026
HomeनगरAMC Election : महापालिका निवडणुकीसाठी मतदान, मतमोजणीची तयारी पूर्ण

AMC Election : महापालिका निवडणुकीसाठी मतदान, मतमोजणीची तयारी पूर्ण

345 केंद्रांवर गुरूवारी मतदान || एमआयडीसीतील गोडाऊनमध्ये शुक्रवारी मतमोजणी

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या गुरूवारी, 15 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून, त्यासाठी प्रशासनाकडून सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. शहरातील 17 प्रभागांमध्ये एकूण 345 मतदान केंद्रांवर मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडावी यासाठी आवश्यक मनुष्यबळ, साहित्य व सुरक्षा व्यवस्था सज्ज असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली.
दरम्यान, मतदानानंतर सर्व ईव्हीएम मशीन एमआयडीसीतील वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये तयार करण्यात आलेल्या स्ट्राँग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात येणार आहेत. त्यानंतर शुक्रवारी, 16 जानेवारी रोजी सकाळी 9.30 वाजता मतमोजणी प्रक्रियेला सुरूवात होणार आहे, असेही डांगे यांनी सांगितले.

- Advertisement -

महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारी (13 जानेवारी) जाहीर प्रचाराचा शेवटा दिवस आहे. सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी अखेरच्या टप्प्यातील प्रचारावर जोर दिला आहे. विविध पक्षाच्या नेत्यांच्या सभा होत असून, रॅली व प्रत्यक्ष गाठीभेटीवर उमेदवारांनी भर दिला आहे. गुरूवारी मतदान होणार असल्याने प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. मतदानासाठी एकूण एक हजार 800 कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून, मतदान केंद्रांवर आवश्यक त्या सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. लोकशाहीचा हा उत्सव यशस्वी करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी निर्भयपणे व उत्स्फूर्तपणे मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहनही आयुक्त डांगे यांनी केले आहे.

मतदान गुरूवारी पार पडल्यानंतर दुसर्‍या दिवशी लगेच मतमोजणी होणार आहे. शुक्रवारी सकाळी 9.30 वाजता उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत, तसेच मुख्य निवडणूक निरीक्षक आदित्य जीवने व निवडणूक निरीक्षक श्रीमंत हारकर यांच्या समक्ष स्ट्राँग रूम उघडण्यात येईल. प्रथम सकाळी 10 वाजता टपाली मतपत्रिकांची मोजणी करण्यात येईल. त्यानंतर ईव्हीएममधील मतांची मोजणी सुरू केली जाणार आहे.

एकाच वेळी 17 प्रभागांची मतमोजणी
महापालिका निवडणुकीसाठी एकुण 17 प्रभाग असून सर्व 17 प्रभागांची मतमोजणी एकाच वेळी केली जाणार आहे. प्रत्येक प्रभागासाठी टपाली मतदानासाठी 1 टेबल, ईव्हीएम मतमोजणीसाठी तीन टेबल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे टपाली मतदानासाठी 17 टेबल व ईव्हीएमसाठी 51 टेबल असे एकूण 68 टेबलांवर मतमोजणी होणार आहे.

प्रचारासाठी दोनच दिवस
महापालिकेसाठी भाजपा-राष्ट्रवादी (अजित पवार गट) युती, शिवसेना (शिंदे सेना) व महाविकास आघाडी अशी लढत होत आहे. याशिवाय इतर पक्षाकडून काही प्रभागात उमेदवार उभे आहेत. आज (सोमवार) व उद्या (मंगळवार) प्रचारासाठी दोनच दिवस उरले आहेत. मंगळवारी सायंकाळी साडेपाचपर्यंत जाहीर प्रचार करता येणार आहे. या दोन दिवसात प्रचाराला आणखी वेग येणार आहे. नेत्यांच्या सभांसह रॅली व प्रत्यक्ष गाठीभेटीवर उमेदवारांचा भर असणार आहे.

ओळखपत्र बंधनकारक; मोबाईलला बंदी
उमेदवार व त्यांच्या मतमोजणी प्रतिनिधींना संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी ओळखपत्र प्रदान करणार असून, ओळखपत्राशिवाय मतमोजणी केंद्र व परिसरात प्रवेश दिला जाणार नाही. तसेच मतमोजणी केंद्रात मोबाईल, लॅपटॉप, आयपॅड नेण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. माध्यम प्रतिनिधींसाठी स्वतंत्र व अद्ययावत पत्रकार कक्ष स्थापन करण्यात आला असून, प्रसिध्दी अधिकारी नितीन ब्राह्मणे यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे डांगे यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

Crime News : एक कोटींच्या लुटीच्या कटात दोन पोलिसांसह तोतया पत्रकाराचा...

0
पुणे | प्रतिनिधी | Pune पुण्यातील (Pune) सिंहगड रस्ता परिसरातील नवले पुलावर भरदिवसा एका मोठ्या व्यावसायिकाला लुटण्याचा चित्रपटालाही लाजवेल असा थरार घडला असून, याप्रकरणी पुणे...