Friday, June 19, 2026
Homeनगरकोठला परिसरात अतिक्रमण हटाव मोहिमेला विरोध

कोठला परिसरात अतिक्रमण हटाव मोहिमेला विरोध

जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांकडून बळाचा वापर || अतिक्रमणे जमीनदोस्त

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर कोठला परिसरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेत कारवाईला विरोध करणार्‍या जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी महापालिकेच्या पथकामार्फत अतिक्रमणांवर कारवाई केली. यात कोठला, राज चेंबर्स परिसरातील व माळीवाडा बसस्थानक परिसरातील टपर्‍या, दुकानांची अतिक्रमणे जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आली.

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने वाहतूक कोंडीच्या समस्येबाबत निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता. पोलीस व राष्ट्रवादीच्या बैठकीत उपाययोजनांवर चर्चा होऊन कायम रहदारी असलेल्या रस्त्यांवर झालेली अतिक्रमणे महापालिकेच्या सहाय्याने हटवण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार गुरूवारी पोलीस उपअधीक्षक भारती, पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, आनंद कोकरे व पोलिसांचा फौजफाटा महापालिकेच्या पथकाला घेऊन कोठला व माळीवाडा बसस्थानक परिसरात दाखल झाला. तेथील अतिक्रमणांवर कारवाई सुरू करण्यात आली.

कोठला परिसरात कारवाई सुरू केल्यावर एका जमावाने जेसीबीच्या समोर येऊन कारवाईला विरोध केला. मात्र, उपअधीक्षक भारती यांनी आक्रमक भूमिका घेऊन कारवाई सुरू ठेवण्याचे निर्देश दिले. यावेळी जमावाने तीव्र विरोध करण्याचा प्रयत्न करताच पोलिसांच्या पथकाने बळाचा वापर करत जमावाला पांगवले. पोलिसांचा आक्रमकपणा पाहून जमावाने तेथून पळ काढला. यावेळी अतिक्रमणधारकांनीही तत्काळ आपले साहित्य घेऊन तेथून पोबारा केला. महापालिकेच्या पथकाने तेथील टपर्‍या व इतर अतिक्रमणे जेसीबीच्या सहाय्याने तोडून थेट जमीनदोस्त केले.

मनपाच्या जागेतील अतिक्रमण हटवले
शहरातील जुन्या आरटीओ कार्यालयासमोर महानगरपालिकेच्या जागेत करण्यात आलेले पक्के अतिक्रमण अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने कारवाई करून हटवले. तेथील पत्र्याच्या शेड, ऑफीस केबिन जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त करून जागेला कंपाउंड करून जागा ताब्यात घेण्यात आली. या जागेत अतिक्रमण करून वाहन खरेदी विक्रीचा व्यवसाय थाटण्यात आला होता. तेथील अतिक्रमण महानगरपालिकेने यापूर्वी कारवाई करून काढले होते. दरम्यानच्या काळात अतिक्रमणधारकांनी न्यायालयात याचिका दाखल केली व जागेवर दावा करून पुन्हा अतिक्रमण करून व्यवसाय सुरू केला. सदरची जागा महानगरपालिकेच्या मालकीची असून, नगरपरिषद काळात याठिकाणी उद्यानही होते. त्यामुळे न्यायालयात झालेल्या सुनावणीत ही जागा महानगरपालिकेची सरकारी जागा असल्याचे स्पष्ट झाले व जागा तत्काळ खाली करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने अभियंता सुरेश इथापे यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करून अतिक्रमण हटवले. तसेच, जागेला तत्काळ तार कंपाउंंड करून जागा ताब्यात घेण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

कोट्यावधी रुपयांची फसवणूक करणारा गजाआड

0
येवला | प्रतिनिधी Yeola तालुक्यासह राज्यातील विविध भागांमध्ये अर्ध्या किमतीत मोबाईल फोन आणि सोनं मिळवून देण्याचे आमिष दाखवत कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या सुप्रसाद प्रमोद...