अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
मध्य शहरातील वाढत्या अतिक्रमणांमुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता अहिल्यानगर महापालिकेने सलग दुसर्या दिवशीही जोरदार अतिक्रमण हटाव मोहीम राबविली. बुधवारी (4 फेब्रुवारी) आशा टॉकीज चौक, कोतवाली पोलीस ठाणे ते माणिक चौक या गजबजलेल्या भागातील अतिक्रमणे हटविल्यानंतर गुरूवारी (5 फेब्रुवारी) छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, माळीवाडा आणि एसटी स्टँड परिसरातील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली.
महापालिका आयुक्त यशवंत डांगे स्वतः रस्त्यावर उतरून या मोहिमेवर देखरेख करीत होते. गुरूवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरूवात करण्यात आली. या कारवाईत रस्त्यावर अडथळा निर्माण करणार्या हातगाड्या, टपर्या, मटक्याचे शेड तसेच बेकायदेशीरपणे उभारलेली तात्पुरती संरचना हटविण्यात आली. बुधवारी आशा टॉकीज चौक परिसरात महापालिकेच्या पथकाने सुमारे 150 अतिक्रमणे हटविली होती. त्यानंतर गुरूवारी माळीवाडा व एसटी स्टँड परिसरात करण्यात आलेल्या कारवाईमुळे दीर्घकाळापासून अतिक्रमणांनी ग्रासलेल्या रस्त्यांना मोकळा श्वास मिळाला आहे. परिणामी वाहतूक कोंडी कमी होऊन वाहनचालक व पादचार्यांना दिलासा मिळाला.
या मोहिमेदरम्यान उप अभियंता सुरेश इथापे, अतिक्रमण प्रमुख आदित्य बल्लाळ, क्षेत्रीय अधिकारी नितीन इंगळे, क्षेत्रीय अधिकारी शेख रिजवान यांच्यासह महापालिकेचे अतिक्रमण पथक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली. शहरातील प्रमुख चौक व बाजारपेठांमधील अतिक्रमणे टप्प्याटप्प्याने हटविण्याची मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत महापालिका प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. अतिक्रमणांमुळे पुन्हा रस्ते अरूंद होऊ नयेत, यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.





