अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
शहरातील विकास योजनेत मंजूर असलेल्या रस्त्यांची कामे सध्या प्रगतिपथावर आहेत. काही ठिकाणी रस्त्याच्या कामात अतिक्रमणांचा अडथळा निर्माण झाला आहे. हसन शहा कब्रस्तान ते कोठी चौक व फरत हॉटेल ते कानडे मळा (जुना सोलापूर रस्ता) या दोन डीपी रस्त्याला जोडणार्या लिंक रस्त्याच्या कामात अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटवण्यात आली आहेत. त्यामुळे या रस्त्याच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे. शहरात इतरत्र रस्त्यात अडथळा ठरणारी अतिक्रमणे काढून घ्यावीत, अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिला आहे.
हसन शहा कब्रस्तान ते कोठी चौक व फरत हॉटेल ते कानडे मळा (जुना सोलापूर रस्ता) या दोन डीपी रस्त्याला जोडणार्या लिंक रस्त्याच्या कामात 115 पेक्षा अधिक घरे व 12 पेक्षा अधिक व्यावसायिक टपर्या अडथळा ठरत होत्या. या अतिक्रमणांमुळे रस्त्याचे काम रखडले होते. सुमारे 400 मीटर लांब व 12 मीटर रूंद असलेल्या या रस्त्याच्या कामासाठी नागरी दलित वस्ती सुधार योजनेतून 2 कोटी 70 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला पावसाळी गटारी, भुयारी गटार योजना व काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे.
अतिक्रमणामुळे अनेक दिवसांपासून रस्त्याचे काम रखडले होते. आयुक्त डांगे यांनी यात लक्ष घालून अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटवण्याचे आदेश दिले. त्यानुसार अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने जेसीबीच्या सहाय्याने 115 पेक्षा अधिक घरे व 12 पेक्षा अधिक टपर्यांची अतिक्रमणे हटवण्यात आली आहेत. सायंकाळपर्यंत ही कारवाई सुरू होती. रस्त्याच्या मंजूर असलेल्या कामात नागरिकांची अतिक्रमणे असल्यास ती काढून घ्यावीत, अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्त डांगे यांनी दिला आहे. दरम्यान, शहरातील दिल्ली गेट, चौपाटी करंजा, चितळे रस्ता या ठिकाणच्या रस्त्याच्या कामात अडथळा ठरणारे अतिक्रमणांवरही लवकरच हातोडा पडणार असल्याचे मनपा प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.