अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
शहरातील सर्व ओढे व नाल्यांच्या साफसफाईचे काम 50 टक्के पूर्ण झाले आहे. मे अखेरीपर्यंत नालेसफाईचे काम पूर्ण करण्याचे निर्देश ठेकेदार संस्थेला देण्यात आले आहेत. दरम्यान, नाल्यांची साफसफाई करताना मोठ्या प्रमाणात प्लास्टिक व इतर कचरा टाकल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे यापुढे ओढे व नाल्यांमध्ये कचरा टाकणार्यांवर कारवाई सुरू केली जाणार आहे. त्यासाठी स्वतंत्र पथके नियुक्त करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली.
महानगरपालिकेमार्फत सुरू असलेल्या नालेसोफाईच्या कामाचा डांगे यांनी आढावा घेतला. सद्यस्थितीत सनी पॅलेस, सूर्य नगर ते अर्जुन वॉशिंग सेंटर नगर- मनमाड रस्ता येथील नाल्याचे साफसफाईचे 80 टक्के काम पूर्ण झालेले आहे. गजराज फॅक्टरी जवळ काम चालू आहे. नवीन जिल्हाधिकारी कार्यालय, मारूती मंदिर ते गंगा उद्यान ते सिव्हिल हडको ते दामोदर बिर्याणी हाऊस ते महावीर नगर, चिंतामणी हॉस्पिटल ते सुडके मळ्यापर्यंतचे नालेसफाईचे काम पूर्ण झाले आहे. शहरातील सर्व ओढे व नाल्यांच्या साफसफाईचे काम जवळपास 50 टक्के पूर्ण झाले आहे.
मात्र, नालेसफाई करताना ओढे व नाल्यांवर असलेल्या पुलाच्या दोन्ही बाजूला नागरिकांनी प्लास्टिक, टाकाऊ वस्तू व इतर कचरा मोठ्या प्रमाणात टाकल्याचे आढळून आले आहे. नालेसफाई करताना या कचर्यासह गाळ, पानगवत, झाडेझुडुपे काढण्यात आली आहेत. नागरिकांनी उघड्यावर, नाल्यामध्ये कुठलाही कचरा टाकू नये. कचरा टाकताना आढळल्यास दंड करण्यात येणार आहे. यासाठी महानगरपालिकेचे स्वतंत्र पथके नियुक्त केली जाणार असल्याचे डांगे यांनी स्पष्ट केले.