अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवा आयुक्तालयातर्फे दरमहा जाहीर होणार्या आरोग्य कार्यक्रमांच्या राज्यस्तरीय रँकिंगमध्ये जानेवारी 2025 मध्ये अहिल्यानगर महानगरपालिकेने प्रभावी कामगिरी करत दहावा क्रमांक मिळवला आहे. राज्यातील 27 महानगरपालिकांमध्ये स्थान मिळवताना महापालिकेने विविध आरोग्य उपक्रमांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने जानेवारी महिन्यात विविध प्रभावी मोहिमा राबवून पाच मुद्द्यांमध्ये विशेष उल्लेखनीय गुण मिळवले. यासोबतच, आगामी काळात या मोहिमेवर विशेष नियोजन करून अधिक प्रभावी आरोग्य कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. 11 जुलै 2024 रोजी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी जुलै महिन्यात आरोग्य विभागाची आढावा बैठक घेतली. या बैठकीत महत्त्वाच्या सूचना देऊन कार्यपध्दतीत सुधारणा करण्याचे आदेश दिले होते. तथापि, एप्रिल ते डिसेंबर 2024 पर्यंत अपेक्षित सुधारणा न दिसल्याने 17 जानेवारी रोजी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांना सक्तीच्या रजेवर पाठवून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. त्यानंतर आयुक्तांनी स्वतः लक्ष घालून जानेवारी 2025 च्या रँकिंगमध्ये सुधारणा करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या.
एप्रिल ते डिसेंबर 2024 या कालावधीत अहिल्यानगर महानगरपालिकेचा राज्य रँकिंगमध्ये सातत्याने नीचांक होता. पालिकेचे स्थान 26 ते 27 व्या क्रमांकावर होते. मात्र, जानेवारी 2025 मध्ये 10 वा क्रमांक मिळवण्याचा उल्लेखनीय टप्पा गाठण्यात आला आहे. आगामी काळात, राज्यात पहिल्या तीन क्रमांकांमध्ये स्थान मिळवण्याचा महानगरपालिकेचा निर्धार आहे. या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी सर्व स्तरांवर अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्यात येणार आहे. महानगरपालिका प्रशासन नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी वचनबध्द असून, भविष्यात अधिक चांगल्या कामगिरीसाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचे आयुक्त डांगे यांनी सांगितले.
डेंग्यूमुक्त शहराकडे वाटचाल
आयुक्तांच्या नेतृत्वाखाली 12 आठवड्यांचे डेंग्यूमुक्त अभियान विविध प्रभागांत प्रभावीपणे राबविण्यात आले. या मोहिमेमुळे शहरातील डेंग्यू नियंत्रणात येऊन, डेंग्यूमुक्त शहराकडे वाटचाल सुरू झाली आहे. महानगरपालिकेच्यावतीने आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी भविष्यातील विविध आरोग्य योजनांवर भर दिला जाणार आहे. मातृ आणि बाल आरोग्य सुधारणा, कुटुंब नियोजन आणि लसीकरण कार्यक्रमांचे व्यापक आयोजन, संक्रामक व असंक्रामक रोग नियंत्रणासाठी विशेष उपक्रम, तंत्रज्ञानाच्या मदतीने आरोग्य व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे राबविले जाणार आहे.