अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
महापालिकेची (Ahmednagar Municipal Corporation) परवानगी न घेता दिमाखात झळकत असलेल्या होर्डिंग्जला (Hoardings) अखेर दणका देणे आज मंगळवारपासून (28 मे) सुरू झाले आहे. स्टेशन रस्त्यावरील क्लेरा ब्रुस मैदानावरील तीन बेकायदा होर्डिंग्जपैकी दोन होर्डिंग्ज मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने (Encroachment Removal Team) मंगळवारी सकाळी जमीनदोस्त केले व तिसर्यावरही हातोडा घालण्याची कारवाई सुरू केली होती. दरम्यान, काल सोमवारी (27 मे) सुरू होणारी ही मोहीम एक दिवस उशिराने सुरू झाल्याने कारवाई होणार की नाही, अशी शंका होती. पण ती फोल ठरवत मनपाने बेकायदा होर्डिंग्जला दणका देणे सुरू केले आहे. पहिल्या टप्प्यात 83 विनापरवाना होर्डिंग्ज (Hoardings) तोडले जाणार आहेत.
मुंबईतील घाटकोपर (Mumbai Ghatkopar) येथे भलेमोठे होर्डिंग्ज वादळामुळे पेट्रोल पंपावर कोसळल्याने त्याखाली 17 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यभरातील सर्वच शहरांतील होर्डिंग्ज व त्यांची स्थिती ऐरणीवर आली. नगर मनपानेही शहरात फिरून सर्वच होर्डिंग्जची खानेसुमारी केली. शहरात 384 अधिकृत होर्डिंग्ज साईटस आहेत व त्या मनपानेच अंतिम केल्या आहेत. मात्र, जेव्हा सर्वच होर्डिंग्जची माहिती घेणे सुरू केले, तेव्हा तब्बल 83 होर्डिंग्ज बेकायदा उभारले असल्याचे आढळले. या होर्डिंग्जसाठी मनपाची कोणतीही परवानगी घेतली गेलेली नाही वा त्यांचे नियमाप्रमाणे असणारे शुल्कही भरण्याची तसदी घेतलेली नव्हती. याशिवाय परवानगी घेऊन उभारण्यात आलेल्या 44 होर्डिंग्जने परवानगी मुदत संपल्यावर ती वाढवून घेण्याचे व त्यासाठीचे शुल्क भरण्याचेही कष्ट घेतलेेले नव्हते.
या दोन्ही मिळून 127 होर्डिंग्जला मनपाला (Ahmednagar Municipal Corporation) नोटिसा पाठवल्या. मात्र, त्यावर त्यांच्याकडून समाधानकारक खुलासे आले नसल्याने अखेर मनपाने या होर्डिंग्जवर हातोड्याचे दणके देऊन ते जमीनदोस्त करण्याचा निर्णय घेतला. मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाचे प्रमुख आदित्य बल्लाळ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मंगळवारपासून ही कारवाई सुरू केली. सोमवारपासून अनधिकृत होर्डिंग्ज उतरवण्याची कारवाई करण्याचे नियोजन करण्यात आले होते. शहर व उपनगर परिसरात महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात 384 परवानाधारक होर्डिंग्जसह तब्बल 83 अनधिकृत होर्डिंग्ज आढळून आले व 44 होर्डिंग्जचा परवाना संपुष्टात आला असल्याचे स्पष्ट झाले होते. या सर्व होर्डिंग्ज मालकांना तत्काळ नोटीसा (Notice) बजावण्याचे आदेश प्रभाग अधिकार्यांना देण्यात आले होते. त्यानुसार नोटीसाही बजावण्यात आल्या होत्या. आता प्रत्यक्षात कारवाई सुरू केली गेली आहे.
दबाव नसल्याचा दावा
या कारवाईदरम्यान शहरात परवाने देण्यात आलेल्या 384 होर्डिंग्जचीही तपासणी केली जाणार आहे. राजकीय दबावाची चर्चा होती. पण तसे काही नसल्याचा खुलासा मनपाद्वारे केला जात आहे. पथकाने सोमवारी क्लेरा ब्रूस मैदानावर कारवाईचे नियोजन केले होते मात्र, होर्डिंग्ज मालकांचा विरोध व राजकीय दबावामुळे ही कारवाई बारगळल्याचे सांगितले जात होते. मात्र, आज मंगळवारपासून ही कारवाई सुरू झाल्याने सारे विरोध व दबाव झुगारून मनपाने कडक भूमिका स्वीकारल्याचे दिसू लागले आहे.
त्यांची रजाही चर्चेत
होर्डिंग्जला परवानगी देताना शासनाने निश्चित केलेल्या नियमांचे पालन केले आहे का, परवानगीनुसार त्याच आकाराचे होर्डिंग्ज आहे की मोठे आहे, होर्डिंग्ज योग्य पद्धतीने शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार उभारले आहेत का, इमारतीवर होर्डिंग्ज असल्यास त्या इमारतीचे व ज्यावर होर्डिंग्ज उभारले आहे, त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले आहे का, आदी विविध मुद्यांवर तपासणी करण्याचे आदेश प्रभाग अधिकार्यांना देण्यात आले होते. त्यानंतर काही प्रभाग अधिकारी रजेवर गेल्याने त्यामागील नेमक्या कारणांचीही चर्चा सुरू आहे.