अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
महापालिकेतील राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या (NCP) नगरसेवकांचा गट नेता (Group Leader) म्हणून प्रभाग 14 मधून बिनविरोध नगरसेवक झालेले प्रकाश भागानगरे (Corporator Prakash Bhaganagare) यांची नियुक्ती झाली आहे. तर भाजपने (BJP) त्यांच्या गट नेता पदी प्रभाग एक मधून निवडून आलेल्या शारदा ढवण (Sharda Dhawan) यांची नियुक्ती केली आहे. मात्र, दोन्ही पक्षांकडून उप गट नेता नेमला गेला नाही.
नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालयात भाजप व राष्ट्रवादी अजित पवार गटाने (BJP And NCP) बुधवारी (21 जानेवारी) स्वतंत्रपणे गट नोंदणी केली. आता सर्वांना प्रतीक्षा आज गुरूवारी (22 जानेवारी) निघणार्या महापौर पदाच्या आरक्षणाची आहे. आज अहिल्यानगर मनपाचा महापौर कोण होणार हे आरक्षण सोडतीनंतर स्पष्ट होणार आहे. राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष व नगरसेवक संपत बारस्कर यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या 27 नगरसेवकांनी बुधवारी विभागीय आयुक्त कार्यालयात त्यांच्या गटाची नोंदणी केली.
नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी (अजित पवार गट), अहिल्यानगर या नावाने ही गट नोंदणी केली गेली व या गटाचा नेता म्हणून प्रकाश भागानगरे यांची नियुक्ती केली असल्याचे त्यात नमूद केले गेले. यानंतर भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या 25 नगरसेवकांची गट नोंदणी झाली. त्यांनी त्यांच्या गटाचा नेता म्हणून नगरसेविका शारदा ढवण यांची नियुक्ती केल्याचे त्यात नमूद केले. भारतीय जनता पार्टी, अहिल्यानगर या नावाने ही गट नोंदणी केली गेली आहे.
दरम्यान, दोन्ही पक्षांनी युती म्हणून निवडणुक लढवली असून गटनेते पदाची नोंदणी मात्र स्वतंत्र्य केली आहे. तसेच दोन्ही पक्षांनी फक्त गटनेते पदाची नोंदणी केली असून उपगट नेता म्हणून कोणाची नियुक्ती केलेली नाही.
गटनेत्यांनाच सर्वाधिकार
महापालिकेत संबंधित पक्षाचा गट नेता हा त्या पक्षाच्या नगरसेवकांचा नेता असतो. स्थायी समिती व महिला आणि बालकल्याण समिती सदस्य तसेच स्वीकृत नगरसेवक सदस्यांची नावे सुचवण्याचे अधिकारही गट नेत्यालाच असतात. आता मनपात सत्ताधारी राष्ट्रवादी व भाजप युतीच्या गटाने त्यांचे गट नेते नेमले आहेत. शिंदे सेनेचे 10 नगरसेवक असून, त्यांची गट नेता नियुक्ती येत्या दोन दिवसात होणार असल्याचे सांगण्यात आले.




