Monday, November 25, 2024
Homeब्लॉगमहापालिकेतील ‘मळकट’ चेहरे

महापालिकेतील ‘मळकट’ चेहरे

कोणत्याही नव्या वादाचे, सर्वसामान्य नागरिकांना शरमेने खाली मान घालायला लावायचे प्रकार कुठे घडत असतील, तर त्याचे उगमस्थान महापालिका असते. गेल्या काही वर्षांपासून जे काही घडत आहे, ते पाहता असे म्हणणे वावगे नाही. दोन वरिष्ठ अधिकार्‍यांसह दोन कर्मचार्‍यांच्या (त्यात एक महिला) दारूच्या पार्ट्या सध्या जिल्हाभर गाजत आहेत. पार्टी करताना या महाभागांनी एका अल्पवयीन मुलाचा केलेला छळ, त्याला दिलेले चटके, इमारतीवरून फेकून देण्याचा केलेला प्रयत्न संतापजनक आहे. त्याही पेक्षा या अधिकार्‍यांवर कोणतीही कारवाई करण्याचे नाव न घेणारे अतिवरिष्ठ अधिकार्‍यांची भूमिका अधिक संतापजनक आहे. विद्रूप चेहरे सांभाळताना आपलाही चेहरा मळकट होत असल्याचा विसर या अधिकार्‍यांना आणि एकूणच यंत्रणेला पडला आहे.

महापालिकेतील एका कर्मचार्‍याचे अडीच वर्षांपूर्वी निधन झाले. कोणत्याही कुटुंबासाठी कुटुंबप्रमुखाचे निधन अत्यंत संवेदनशील विषय असतो. अनुकंपा धर्तीवर या कुटुंबातील महिलेला म्हणजे निधन झालेल्यांच्या पत्नीला नर्सची नोकरी महापालिकेने दिली. नोकरी मिळाली, म्हणजे गेलेले सर्वस्व मिळाले, असे नव्हे. मात्र संवेदनशीलतेतही आपल्यातील असंवेदनशिलता दाखविणारे काही महाभाग असतात. या महाभागांच्या गळाला ही महिला कर्मचारी लागली अन मग सुरू झाला पार्टीचा सीलसिला. बोल्हेगाव येथील संबंधित महिलेच्या फ्लॅटमध्ये वेळोवेळी या पार्ट्या रंगत होत्या. आपल्या घरात एक मुलगा आणि एक मुलगी असल्याचा विसर पडावा, एवढी ही महिला निर्ढावली होती. अर्थात त्यामागे नोकरी जाण्याची भिती की अन्य काही, हा संशोधनाचा आणि तपासाचा विषय आहे. कारण या पार्टीमध्ये सहभागी असलेला एक वैद्यकीय आरोग्य अधिकारी आहे. या महिलेसह वैद्यकीय आरोग्य अधिकारी असलेले डॉ. अनिल बोरगे, अग्निशमन विभागाचे प्रमुख शंकर मिसाळ आणि याच विभागात काम करणारा बाळू घाटविसावे असे या अन्य पार्टी सदस्यांची नावे आहेत.

- Advertisement -

पार्ट्यांमधील वंगाळ अन बिभत्सपणा पाहून म्हणा किंवा नेहमीच्या त्रासाला कंटाळून म्हणा, त्या अल्पवयीन मुलाने अशा पार्ट्यांना विरोध दर्शवायला सुरूवात केली. पार्टीसाठी शाही ठिकाण मिळाल्यामुळे अधिकारी आणि चटावल्यामुळे महिला यांना हा विरोध नकोसा होता. त्यामुळे त्यांनी मुलालाच त्रास द्यायला सुरुवात केली. कधी मारहाण कर, कधी चटके दे तर कधी अन्य काही छळ कर असे प्रकार सुरू झाले. या सर्वांना वैतागून संबंधित मुलाने आपला छळ होत असल्याची फिर्याद पोलिसांकडे दिली. त्यामध्ये वरील तिघांसह आपल्या आईचेही आरोपीमध्ये नाव समाविष्ट केले. आईचे नाव समाविष्ट करण्यापर्यंत मानसिकता यावी, याचाच अर्थ या नात्याच्या उबेपेक्षा तो त्रास असह्य होता, असेच म्हणावे लागेल. हा सर्व प्रकार आता नगर जिल्ह्याला तोंडपाठ झाला आहे. तक्रारीची चौकशी होईल, त्यातून जे पुढे येईल त्यावर पुढची कारवाई ठरलेली असेल.

यातील तपासाचा भाग सोडूनही चर्चा होणे आवश्यक आहे. चर्चा यासाठी आवश्यक आहे, की असे विद्रुप चेहरे सांभाळण्याचे पातक सध्या महापालिका करत आहे. या प्रकारातील सर्व आरोपी महापालिकेचे कर्मचारी आहे. त्यात दोन वरिष्ठ अधिकारी आहेत. त्यामुळे महापालिकेची सर्वत्र ‘छी थू’ झाली आहे. या चौकडीमुळे इतरांकडेही पाहण्याच्या नजरा बदलू शकतात. शहरात करोनाचा कहर माजलेला असताना त्यावर उपाययोजना करण्याऐवजी वैद्यकीय आरोग्य अधिकारी रंग उधळत रात्र कटवत होता, आगीवर नियंत्रण मिळवणारा अग्निशमन विभागाचा प्रमुख दुसर्‍याच्या घरात अल्पवयीन मुलाला चटके देत होता हे संतापजनक आहे. महापालिका आयुक्त, उपायुक्त यांना हे नेहमीचेच वाटत असावे. म्हणूनच अद्याप या चौघांपैकी कोणावरही कारवाई झालेली नाही.

महापालिकेत कोणावर कारवाई करायची, याचा निर्णय त्यांनी केलेल्या चुकीवर किंवा गुन्ह्यावर अवलंबून नसते, तर ‘चेहरा’ पाहून ठरविले जाते, हे पुन्हा एकदा या घटनेमुळे अधोरेखित झाले आहे. स्वच्छता अभियान चालू असताना एका स्वच्छता निरीक्षकाने सोशल मिडियावर एक मेसेज व्हायरल केला होता. त्यामध्येही दारूचा उल्लेख होता. या उल्लेखामुळे महापालिकेची बदनामी झाली, असे सांगत आख्खे शहर डोक्यावर घेऊन संबंधिताला निलंबित करण्याची मागणी केली होती. त्यानुसार ती कारवाई झाली देखील. मात्र दारूच्या पार्ट्या करताना अल्पवयीन मुलाचा छळ होत असल्याचा प्रकार अद्याप महापालिकेची बदनामी होण्याइतपत आहे, याचा उलगडा महापालिका प्रशासनाला झालेला नसावा.

स्वच्छता निरीक्षकावर कारवाईसाठी महापालिका कर्मचारी युनियन आणि त्याच्या पदाधिकार्‍यांनी देव पाण्यात टाकले होते. महापालिकेची किती बदनामी झाली, हे ते आयुक्तांसह वरिष्ठ अधिकार्‍यांना वारंवार पटवून देत होते. कोणत्याही परिस्थितीत संघटनेला व त्याच्या पदाधिकार्‍यांना संबंधित स्वच्छता निरीक्षकाचे निलंबन हवे होते. महापालिकेची बदनामी झाल्याचे जरी कारण पुढे केले जात असले, तरी खरा वाद हा संघटनेतील होता.

त्याचा वचपा त्यांनी घेताना आपण महापालिकेच्या इभ्रतीला किती महत्त्व देतो, याचा आभास त्यांनी निर्माण केला. आज एवढी बदनामी झाल्यानंतरही संघटनेकडून किंवा संघटनेच्या पदाधिकार्‍यांकडून निषेधाचा सूर निघालेला नाही. याबाबतीत त्यांनी गिळलेले ‘मूग’ बरेच बोलके आहेत. महापालिकेचे पदाधिकारीही यापेक्षा वेगळे नाहीत. ‘महापालिकेची बदनामी करणार्‍यांची गय केली जाणार नाही’ अशा वारेमाप गप्पा मारणारे महापौर आणि त्यांचे सहकारी पदाधिकारी संबंधित अधिकार्‍यांवरील कारवाईबाबत आता ब्र काढायला तयार नाहीत. त्यामुळे महापालिकेच्या बदनामीला केवळ विद्रूप चेहरेच नव्हे, तर त्यांना पाठीशी घालण्याचा आटोकाट प्रयत्न करणारे ‘मळकटलेले’ चेहरेही तेवढेच जबाबदार आहेत.

– सुहास देशपांडे

9850784184

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या