अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
महापालिकेच्या तिजोरीवर वाढत्या खर्चामुळे आर्थिक ताण वाढला आहे. मालमत्ता कराची थकबाकी वसूल करण्यासाठी विविध उपाययोजना करूनही अपेक्षित यश मिळत नसल्याने प्रशासन चिंतेत आहे. महापालिका हद्दीतील मालमत्ताधारकांकडे सुमारे 273.73 कोटी रुपयांची थकबाकी होती. या वर्षात 61.71 कोटी रुपये वसूल झाले असून, उर्वरित 212.02 कोटी रुपयांची थकबाकी आहे. ती वसूल करण्याचे आव्हान महापालिकेसमोर आहे. थकीत वसुलीअभावी महापालिकेच्या उत्पन्नाच्या स्रोतांवर परिणाम होत आहे. प्रशासनाने थकबाकीदारांकडून वसुलीसाठी विविध प्रकारच्या उपाययोजना केल्या, तरीही अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही.
दरम्यान, महापालिकेकडून शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, आरोग्य सेवा यांसारख्या मूलभूत सुविधा पुरविण्यात येतात. मात्र, मालमत्ता कराचा मोठा हिस्सा थकीत राहिल्याने या सेवा पुरवताना अडचणी येत आहेत. प्रशासनाने कर न भरलेल्या मालमत्ताधारकांविरोधात कठोर कारवाई केली आहे, तरी काही फरक पडलेला नाही. थकबाकी वसूलीसाठी महापालिकेने प्रभागनिहाय अधिकारी व कर्मचार्यांची नियुक्ती केली. विविध पथके स्थापन केली आहेत. थकबाकी वसूल होण्यासाठी शास्तीमध्ये सवलत देण्यात आली. शास्ती शंभर टक्के माफ करण्यात आली. थकबाकीदारांना नोटिसा बजावल्यानंतर आता थेट मालमत्ता जप्तीची कारवाई देखील सुरू केली आहे. ज्या मालमत्ता जप्त केल्या आहेत, त्यांचा लिलाव करण्यात येणार असल्याचे देखील महापालिकेने जाहीर केले आहे. नळकनेक्शन तोडण्यात आली आहेत, तरी अपेक्षित वसुली होत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता महापालिका प्रशासन हतबल झाले आहे. बड्या थकबाकीदारांना लक्ष्य करण्यात आले आहे, तरी वसुलीचे प्रमाण वाढत नाही.
शहरात एक लाख 31 हजार 328 मालमत्ताधारक असून, त्यांच्याकडे 273.73 कोटी रुपयांची थकबाकी होती. त्यापैकी आतापर्यंत 61.71 कोटी रुपये वसूल झाले आहेत. 37.24 कोटी मागील तर 24.46 कोटी चालू वर्षाची मालमत्ता कराची वसुली झाली आहे. सध्या तरी 212 कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यात 172.71 कोटी ही मागील थकबाकी आहे, तर 39.31 कोटी रुपये चालू वर्षाची वसुली बाकी आहे. महापालिकेने थकबाकीदारांवर कारवाईची धडक मोहीम हाती घेतली आहे. जानेवारी अखेरपर्यंत शास्तीमध्ये 100 टक्के सवलत दिली होती, तरीही थकबाकीदारांनी कर भरलेला नाही. त्यामुळे महापालिकेने जप्ती कारवाई सुरू केली आहे. पाच घरांना सील ठोकले असून, दोन नळ कनेक्शन तोडले आहेत. दरम्यान, महापालिका आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी थकबाकीदार मालमत्ताधारकांना आवाहन केले आहे की, त्यांनी शास्तीमध्ये दिलेल्या सवलतीचा लाभ घेऊन तात्काळ थकीत कराचा भरणा करावा, अन्यथा महापालिकेकडून कठोर कारवाई करण्यात येईल.
शासकीय व मोबाईल टॉवरची थकबाकी जास्त
शहरात विविध शासकीय कार्यालयांसह मोबाईल टॉवरच्या कंपन्यांकडे मालमत्ता कराची थकबाकी मोठी आहे. ती वेळेवर भरली जात नाही. 216 शासकीय कार्यालयांकडे 10.82 कोटी तर मोबाईल कंपन्यांकडे 162 टॉवरची 10.94 कोटी रुपये थकबाकी आहे.