अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
शहरातील कचरा समस्यावर मात करण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून 80 घंटागाड्या उपलब्ध करून दिल्या आहेत. नागरिकांमध्ये कचर्याच्या प्रश्नाबाबत जनजागृती झाली आहे, तर काही नागरिक अजूनही कचरा रस्त्यावर टाकत आहेत. नागरिकांनी आपला कचरा रस्त्यावर टाकल्यास त्यांच्यावर महापालिका प्रशासन दंडात्मक कारवाई करेल, असा इशारा आमदार संग्राम जगताप यांनी दिला.
दरम्यान सामाजिक, शैक्षणिक, विद्यार्थी, महिला मंडळ यांनी पुढे येऊन आपले घर, आपला परिसर, आपले शहर स्वच्छता अभियानामध्ये सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी केले. महानगरपालिकेच्या वतीने पाईपलाईन रस्ता, श्रीराम चौक, एकविरा चौक, संघर्ष चौक, नामदे चौक, छत्रपती संभाजी महामार्गापर्यंत स्वच्छता मोहीम राबवली. यावेळी आ. जगताप, आयुक्त यशवंत डांगे, उपयुक्त संतोष टेंगळे, माजी नगरसेवक निखिल वारे, बाळासाहेब पवार, बाळासाहेब बारस्कर, आदी उपस्थित होते.
डांगे म्हणले की, संत गाडगेबाबा यांनी आपल्या कीर्तनातून समाजाला स्वच्छतेचे महत्व पटवून दिले होते, आजही आपण सर्वजण स्वच्छतेवरच काम करत आहोत. प्रत्येक नागरिकांनी आपली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडल्यास आपले शहर, स्वच्छ सुंदर होण्यास वेळ लागणार नाही. महापालिकेने दैनंदिन स्वच्छतेबरोबर शहरात स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. तरी नागरिकांनी आपापल्या भागामध्ये स्वच्छता मोहीम राबवावी आणि घंटागाडीतच कचरा टाकावा असे ते म्हणाले.





