अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
पावणे दोन वर्षांपूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे झालेल्या मनपातील रस्ता कामांतील भ्रष्टाचाराच्या तक्रारीसंदर्भात ठाकरे सेनेचे खा. संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून यातील दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.
नगर मनपा क्षेत्रातील सुमारे 776 रस्त्यांच्या कामांमध्ये गुणवत्तेचे बनावट थर्ड पार्टी रिपोर्ट, टेस्ट रिपोर्ट तयार करून कोट्यावधी रूपयांचा भ्रष्टाचार झाल्याची ऑनलाईन तक्रार किरण काळे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. यासंदर्भातील पुरावेदेखील सादर केले होते. मात्र पावणे दोन वर्षात या तक्रारीवर काहीच कारवाई न झाल्याने आता काळे यांनी खा. राऊत यांच्याकडे ही तक्रार केली आहे व खा. राऊतांनी काळे यांच्या तक्रारीचा संदर्भ देत मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र पाठवून या भ्रष्टाचारातील दोषींवर कारवाईची मागणी केली आहे. नगर महापालिकेतील 400 कोटींच्या रस्त्यांच्या घोटाळ्याला राजकीय संरक्षण असल्याचा दावा खा. राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून केला आहे.
महापालिकेतील प्रशासक आणि अधिकारी संगनमताने मनपाच्या तिजोरीची लूट करत असल्याचे राऊत यांनी या पत्रात लिहिले आहे. सत्ताधारी महायुतीचे आमदार संग्राम जगताप यांच्या वरदहस्ताने आणि संगनमताने अहिल्यानगर शहरात 2016 ते 2020 दरम्यान सुमारे 776 रस्त्यांचा 350 ते 400 कोटीचा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप त्यांनी पत्रात केला आहे. हा भ्रष्टाचार अहिल्यानगर शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख काळे यांनी पुराव्यानिशी समोर आणल्याचेही राऊत यांनी पत्रात म्हटले आहे. तसेच 2020 ते 2023 या वर्षात सुध्दा अशाच कार्य प्रणालीनुसार 200 ते 300 कोटींचा घोटाळा झाला असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या सगळ्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी राऊत यांनी केली आहे.
रस्त्याच्या कामात घोटाळा नाही : डांगे
असा कोणताही घोटाळा महानगरपालिकेत झालेला नाही. अशी तक्रार माझ्यापर्यंत आलेली नाही. शासकिय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या नावाचा बनावट टेस्ट रिपोर्ट केल्याचा आरोप आहे, त्याबाबतही तक्रार पाहण्यात आलेली नाही. मात्र, बनावट टेस्ट रिपोर्ट म्हणजे त्याचा अर्थ काम झालेच नाही, असा होत नाही, असे सांगत रस्त्याच्या कामांमध्ये कोणताही घोटाळा, अपहार झालेला नसल्याचा खुलासा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केला आहे.




