अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
महानगरपालिकेच्या विविध व्यापारी संकुलातील गाळेधारक व शाळांच्या वर्ग खोल्यांना शासनाच्या नियमानुसार रेडिरेकनरद्वारे भाडे आकारणी करण्यात आलेली आहे. गाळेधारकांना याच दरानुसार भाडे भरावे लागणार आहे. ज्यांनी अर्धवट व जुन्या दराने भाडे भरले असेल, त्यांनी उर्वरित रक्कम तत्काळ जमा करावी. गाळेधारकांनी थकीत भाडे जमा न केल्यास सदर गाळे सील करून त्याचा पुन्हा लिलाव करण्यात येईल, असा इशारा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिला आहे.
नगर शहरात महानगरपालिकेची 33 व्यापारी संकुले आहेत. यात 742 गाळे भाड्याने दिलेले आहेत. तर, सात शाळांना 82 वर्ग खोल्या भाड्याने देण्यात आलेल्या आहेत. सुमारे 25 टक्के गाळेधारक नियमित भाडे भरत आहेत. अनेक गाळेधारक रेडिरेकनरचा दर जास्त असल्याचे कारण देऊन भाडे भरत नाहीत अथवा कमी रक्कम भारतात. या संदर्भात गाळेधारकांसमवेत झालेल्या चर्चेत शासनाचे निर्देश निदर्शनास आणून देण्यात आले आहेत. त्यामुळे, रेडिरेकनर दरानुसारच सर्वांना भाडे भरावे लागणार आहे. यापुढे ज्यांनी अर्धवट भाडे भरले असेल, त्यांनी उर्वरित रक्कम भरावी. अनेक गाळेधारक सदरचे गाळे महानगरपालिकेचे असल्याने भाडे भरण्यास टाळाटाळ करतात. याच गाळ्यांच्या परिसरात मात्र 10 ते 15 पट जास्त भाडे देऊन खासगी गाळे घेतले जातात. तेथे व्यवसाय करून नियमित भाडे देतात. केवळ महानगरपालिकेचे गाळे असल्याने वेगळ्या दृष्टीकोनातून भाडे न भरणे, रेडिरेकनर दरानुसार भाडे देण्यास नकार देणे असे प्रकार सुरू आहेत.
मात्र, यापुढे हे खपवून घेतले जाणार नाही. भाडे न भरल्यास सदर गाळा सील करण्यात येईल. पुढील आठवड्यात ही मोहीम सुरू करण्यात येणार असल्याचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी स्पष्ट केले आहे. महानगरपालिकेच्या वसुली पथकाने वसुली मोहीम सुरू केली आहे. केडगाव, सिद्धीबाग, प्रोफेसर चौक, दाणे डबरा या ठिकाणी महानगरपालिकेचे पथक कारवाईसाठी गेले असता, गाळेधारकांनी रेडिरेकनर दरानुसार सर्व भाडे भरण्याची तयारी दर्शविली आहे. मार्च अखेरपर्यंत पैसे जमा करण्यासाठी अनेकांनी चेक जमा केले आहेत. त्यामुळे ज्या गाळेधारकांकडे भाडे थकीत आहे, त्यांनी तत्काळ थकीत भाडे भरावे व कारवाई टाळावी, असे आवाहनही आयुक्त तथा प्रशासक डांगे यांनी केले आहे.