अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
महानगरपालिकेने भाडेतत्त्वावर दिलेले व्यापारी संकुलातील गाळे, मोकळ्या जागा, शाळा खोल्यांच्या भाडे वसुलीसाठी मोहीम सुरू केलेली आहे. या अंतर्गत थकीत भाडे वसुलीसाठी जप्ती कारवाई सुरू करण्यात आली आहे. महानगरपालिकेचे पथक जप्तीसाठी जाताच काही गाळे धारकांनी थकीत भाडे जमा करण्यास सुरूवात केली आहे.
दरम्यान, सोमवारी एकाच दिवसात सुमारे 61 लाख रुपये जमा झाले आहेत. गाळे धारकांकडून 31 मार्चपर्यंत थकीत भाड्याची रक्कम जमा न झाल्यास तत्काळ गाळे जप्त करून एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात नव्याने लिलाव सुरू करण्यात येणार आहेत. ज्यांनी करारनाम्याचे नूतनीकरण केले नसेल, त्यांनी ते तत्काळ करून घ्यावे. अन्यथा मुदत संपलेले गाळे जमा करून घेत त्याचेही लिलाव करण्यात येणार असल्याचा इशारा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिला आहे.
महानगरपालिकेच्या व्यापारी संकुलातील गाळे, मोकळ्या जागा, शाळा खोल्यांच्या भाडे असे एकूण 20 कोटी 62 लाख 38 हजार 102 रुपये थकबाकी आहे. सर्व व्यापारी संकुलाचे करारनामे संपले असून, त्यांनी नूतनीकरण केलेले नाही. त्यामुळे जुन्या दरानेच भाडे आकारणी सुरू आहे. गाळेधारक व इतरांनी 31 मार्चपूर्वी सर्व थकीत रक्कम न भरल्यास गाळे जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एप्रिल महिन्यापासून सक्तीने गाळे ताब्यात घेऊन त्याचे लिलाव सुरू करण्यात येणार आहेत. तसेच करारनामा नूतनीकरण न केल्यास गाळे सील करून महापालिकेकडे वर्ग करण्यात येणार आहे व त्याचेही लिलाव होणार आहेत.
नवीन करारनामे करून घेण्याचे आवाहन
गंज बाजारसह दाणे डबरा येथील गाळे धारकांनी थकीत रकमेपैकी काही रक्कम सोमवारी एकाच दिवशी जमा केली आहे. सदर रक्कम कमी प्रमाणात भरली असल्याने शिल्लक थकबाकी मोठी आहे. व्यापार्यांनी आयुक्तांची भेट घेऊन मुदत मागितली होती. त्यानुसार सर्वांना 31 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली असून, उर्वरित रक्कम 31 मार्च पर्यंत न भरल्यास कारवाई करण्यात येणार आहे. गाळे धारकांनी तत्काळ सर्व थकीत रक्कम भरून नवीन करारनामे करून घ्यावेत, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे.